घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र२०५० पर्यंत नाशिक कार्बन उत्सर्जनमुक्त

२०५० पर्यंत नाशिक कार्बन उत्सर्जनमुक्त

Subscribe

शहरातील शुद्ध हवेसाठी महापालिकेचा पुढाकार

नाशिक : गेल्या काही वर्षात वाढते शहरीकरण आणि त्यापाठोपाठ आलेल्या समस्यांनी प्रदूषणदेखील वाढले आहे. अशावेळी शाश्वत आणि पर्यावरणस्नेही विकासावर भर देण्यासाठी नाशिक महापालिकेने पुढाकार घेतला असून कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी नाशिक महापालिकेकडून आराखडा तयार करण्यात येत आहे. याकरिता बुधवारी महापालिकेत कार्यशाळा घेण्यात आली.

नाशिक शहरासाठी वातावरण बदल कृती आराखडा (कॅप) विकसित करण्यास सुरुवात केली आहे. नाशिक महानगरपालिकेने २०५० पर्यंत नेट झिरो उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने वातावरणबदल कृती आराखडा बनवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही कार्यशाळा आयोजित केली होती. त्याचबरोबर, वाढणारे तापमान, हवेचे प्रदूषण आणि पूर यांसारख्या वातावरणीय बदलांशी संबंधित आपत्तींचे विश्लेषण करुन कृती कर्यक्रम बनविणे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
२०५० पर्यंत नेट झिरो उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेने महाराष्ट्राच्या व्यापक एकत्रित प्रयत्नांचा हा एक भाग असून राज्यातील ४३ शहरे आणि नागरी क्लस्टरने हे उद्दिष्ट साध्य करण्याचे नियोजित केले आहे. वर्ल्ड रिसोर्सस इन्स्टिट्यूट इंडियाच्या (डब्ल्यूआरआय इंडिया) तांत्रिक सहाय्याने नाशिक महानगरपालिकेतर्फे हरितगृह वायू उत्सर्जन व संवेदनशीलता मूल्यमापन या विषयावर अर्ध्या दिवसाच्या क्षमता वृद्धीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये महानगरपालिका, राज्य महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व इतर लाईन एजन्सींमधील अधिकारी सहभागी झाले होते.

- Advertisement -

शहराच्या संवेदनशीलता मूल्यमापनावरील पहिल्या सत्रात नाशिकमध्ये होऊ शकणार्‍या परिणामांची व्याप्ती आणि वातावरणीय धोक्यांचा आढावा घेण्यात आला. विशेषतः शहरी उष्णता व हवेचे प्रदूषण, तसेच त्यांचा शहरातील रहिवासी व पायाभूत सुविधांवर होणारा परिमाण याची विस्तृत माहिती या सत्रात देण्यात आली. दुसर्‍या सत्रामध्ये, नाशिक शहरासाठी हरितगृह वायूंचे आणि क्षेत्रनिहाय योगदानाचे प्राथमिक विश्लेषण करण्यासाठी वापरण्यात आलेली कार्यपद्धती व साधने यावर प्रकाश टाकण्यात आला. त्याचप्रमाणे वाहतूक, निवासी आणि अनिवासी इमारती यातिल उर्जा वापर, आणि शहरातील घनकचरा यासारख्या उत्सर्जनातील प्रमुख क्षेत्राचे योगदानदेखील स्पष्ट करण्यात आले. या उपक्रमास अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, सिटी लिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी चव्हाणके, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत, नगर नियोजन उपसंचालक हर्षल बाविस्कर, सहसंचालक नगर नियोजन कल्पेश पाटील उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -