घरमहाराष्ट्रनाशिकसर्दी-खोकल्याने नाशिककर जाम, रुग्णालयांत वाढली गर्दी; संसर्गजन्य रूग्णांच्या संख्येत वाढ

सर्दी-खोकल्याने नाशिककर जाम, रुग्णालयांत वाढली गर्दी; संसर्गजन्य रूग्णांच्या संख्येत वाढ

Subscribe

नाशिक : सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल सुरू आहेत. रात्री थंडी आणि दिवसा उकाडा असा विरोधाभास असल्याने या वातावरणाचा थेट आरोग्याला फटका बसत आहे. परिणामी सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घशाचा संसर्ग यामुळे सर्वच वयोगटातील रुग्णांची संख्या वाढली आहे. इन्फेक्शनचे दररोजच्या ओपीडीत सुमारे ५० ते ६० टक्के तर, न्यूमोनियाचे १० ते १५ टक्के रुग्ण आढळून येत असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. बदलते वातावरण आणि साथीचे आजार हे समीकरण नवीन नसले तरी सध्या वातावरणातील बदलाचा आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे.

सध्या थंडी आणि ऊन असा ऋतुसंधीकाळ असल्याने संसर्गजन्य आजारांत वाढ झाली आहे. यात जंतूसंसर्गातून न्यूमोनिया आजाराचा धोका बळावला आहे. त्यातच सर्दी आणि खोकला या दोन्ही तक्रारींमुळे कफ होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच न्यूमोनियाची लागण होत असल्याचे डॉक्टर सांगतात. यासोबतच तापाच्या रुग्णांमध्येदेखील लक्षणीय वाढ झाली आहे. बदलते हवामान हे न्यूमोनिया वाढीचे प्रमुख कारण असून, काळजी न घेता बाहेर फिरणार्‍यांना त्याचा फटका बसतो आहे.

- Advertisement -

कधी थंडी तर कधी कोरड्या वातावरणामुळे सध्या विविध आजारांनी डोके वर काढले आहे. घरोघरी सर्दी, खोकला व तापाच्या रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे शासकीय रूग्णालयांसोबतच खासगी दवाखान्यांमध्येही गर्दी होवू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला या वातावरणात जुळवून घेणे सहज शक्य होत नाही. लहान मुले, वृद्ध व रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना साथीच्या आजाराची लागण लवकर होत असते. वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य आजारांमध्येही वाढ झालेली आहे. श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींना या वातावरणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. शहरासह जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सर्दी, खोकला, थंडी-ताप अशा रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दरम्यान, आजार वाढल्याचे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आरोग्याप्रती जनजागृती करणे गरजेचे आहे. व्हायरल फीवरचाही अनेकांना त्रास होऊ लागला आहे.

दिवसा उन्हाच्या झळा तर, सायंकाळनंतर पहाटेपर्यंत शीतलहरी शरीराला झोंबत असल्याने याचा सर्व परिणाम हा लहानांपासून तर वृद्धांपर्यंत अनेकांना होत आहे. अन्य गंभीर आजारांपेक्षाही सर्दी, खोकल्याचा त्रास वाढताना दिसत आहे.
लहान मुलांना सर्दीमुळे कान दुखणे, ताप येणे यांसारखी लक्षणे दिसून येत आहेत. परिणामी सर्दी, ताप व खोकल्याचे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात धाव घेत आहेत. तर अनेकजण घरगुती उपचारसुद्धा करीत आहेत. विशेष म्हणजे हिवाळा सुरू झाल्यापासूनच सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढलेले असून सध्याच्या वातावरण बदलामुळे त्यात पुन्हा भर पडली आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास वाढून ताप येतो. ताप वाढत गेल्यास प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. लहान मुलांना न्यूमोनिया होण्याचेही प्रमाण वाढले आहे. सध्या बालरुग्णालयात न्यूमोनियाचे रुग्ण वाढल्याचे दिसून येते. सर्दी, खोकल्याचा त्रास लहान मुलांना सर्वाधिक होतो. याशिवाय वृद्धांनाही खोकल्याचा त्रास जाणवत असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -
मास्क वापरा, वेळीच डॉक्टरांकडे जा

कोरोना संकटानंतर देशभरात सर्दी-खोकला आणि तापाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरने नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. बहुतांश रुग्णांमध्ये संसर्गजन्य आजारांची लक्षणे असल्याने साबनाने हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे, खोकताना किंवा शिंंकताने रुमाल वापरणे, लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे, असे आवाहन आयसीएमआरने केले आहे.

प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांसाठी…

ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी असते त्यांना संसर्गजन्य आजारांचा त्रास इतर व्यक्तींच्या तुलनेत अधिक असतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी हस्तांदोलन टाळणे, बाहेरील पदार्थ टाळणे, गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क लावून जाणे गरजेचे असते. विशेषतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना बदलते वातावरण आणि संसर्गजन्य आजारांचा त्रास चटकन होतो. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करतानाच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.

अशी घ्याल काळजी
  • संसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांपासून दूर राहावे
  • लक्षणे दिसताच वेळीच उपचार सुरू करावेत
  • सर्दी-खोकला वाढण्याआधीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
  • लहान मुलांमध्ये श्वसनसंबंधी तक्रारी वाढत आहेत, त्यांची काळजी घ्यावी
  • न्युमोनिया, फ्लुसदृश आजार डोके वर काढत आहे. दिवसा उष्णता असली तरी थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक्सचा वापर टाळावा.
  • शक्यतो उकळून गार केलेले पाणी प्यावे
  • सकाळच्या वेळी बाहेर फिरताना तोंडावर मास्क अथवा रुमाल बांधावा
  • सकाळी कडक थंडी असल्यास बाहेर जाणे टाळावे

वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होतो आहे. यामुळे रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नागरिकांनी सभा, समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमाला जाताना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तसेच, संसर्गजन्य आजार वाढत असल्याने आजारी व्यक्तींपासून दूर राहावे. : डॉ. प्रवीण गाजरे, चिन्मय हॉस्पिटल

वातावरणातील बदल, कमी झालेली प्रतिकारशक्ती व चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आजार वाढले आहेत. आरोग्यासंबंधी तक्रारी असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करून औषधोपचार करावेत. परस्पर औषधोपचार करू नयेत. : डॉ. के. एस. कोठावदे, कृष्णा हॉस्पिटल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -