नाशिकमधील आडगावच्या आयटी पार्कला मिळणार केंद्राची साथ

औद्योगिक विभागाच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत कॉमन फॅसिलिटी सेंटर व टेक्नॉलॉजी सेंटरसाठी निधी मंजुरीची ग्वाही

नाशिक – नाशिकमध्ये आयटी कंपन्यांचा विस्तार होण्यासाठी आवश्यक बहुउद्देशीय केंद्र स्थापनेसाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून, त्यासंदर्भात औद्योगिक विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी केंद्र सरकारच्या माध्यमातून कॉमन फॅसिलिटी सेंटर व टेक्नॉलॉजी सेंटरसाठी निधी मंजूर करण्याची ग्वाही देण्यात आली. आडगाव शिवारात मंजूर करण्यात आलेल्या आयटी पार्कच्या प्रकल्पाला या माध्यमातून केंद्र शासनाचीही मदत मिळणार असल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी यावेळी दिली.

आयटी पार्कमध्ये आयटी कंपन्यांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर, कन्व्हेंन्शन सेंटर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर, आयओटी, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, सेंटर ऑफ एक्सलन्स फोर अ‍ॅग्रीटेक, फिनटेक, प्रॉडक्ट गॅलरी, इंक्युबेशन सेंटर, प्लगड् प्ले सॅटेलाईट ऑफिसेस असलेले बहुउद्देशीय केंद्र स्थापन व्हावे या उद्देशाने उद्योग मंत्रालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महापालिका आणि आयटी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक पार पडली. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व भारत सरकारच्या सुक्ष्म लघु व माध्यम उद्यम बोर्डाचे सदस्य प्रदीप पेशकार यांच्या समन्वयातून ही बैठक संपन्न झाली. यावेळी महापौरांनी उपक्रमाची संकल्पना सांगितली. याप्रसंगी प्रामुख्याने केंद्र शासनाच्या योजना व सहकार्य यासंबंधी उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत यांनी माहिती दिली. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी यासाठी आवश्यक ती कारवाई सुरू केली असून लवकरच या विषयाची मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले.

महापालिकेच्या वतीने ज्या सोयीसुविधा प्रस्तावित जागेत व संपूर्ण परिसरात देण्यात येणार आहेत त्याविषयीची माहिती टाऊन प्लॅनिंगचे प्रमुख सी. बी. आहेर यांनी दिली. बाविस्कर यांनी आयटी संबंधीची नियमावली व मंजुरी संदर्भात माहिती दिली. नगरसेविका हिमगौरी आडके यांनी शहराच्या विकासासाठी आयटी कंपन्याचा विस्तार कसा महत्वाचा आहे याबद्दल माहिती दिली. या ठिकाणी आयटी कंपन्यांच्या सोयीसाठी व विविध कॉमन फॅसिलिटीज संबंधी प्रसिद्ध उद्योजक अरविंद महापात्रा यांनी आराखडा सादर केला. तसेच उद्योजक नीता अध्यक्ष अरविंद कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, शशांक वाघ, अभिषेक निकम यांनी चर्चेत भाग घेतला. महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाचे विभागीय अधिकारी नितीन गवळी व कार्यकारी अभियंता बोरसे यांनी सुद्धा आवश्यक ते सहकार्य असेल याबद्दल ग्वाही दिली. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्यम बोर्डाचे सदस्य प्रदीप पेशकर यांनी या प्रकल्पाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या माध्यमातून कॉमन फॅसिलिटी सेंटर तसेच टेक्नॉलॉजी सेंटर इत्यादी योजनेसाठी असलेला निधी मंजूर करून आणण्याची ग्वाही दिली.

पायाभूत सुविधाही मिळणार

सत्ताधारी भाजपच्या महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या आयटी पार्कला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे. आडगाव शिवारातील आरक्षित जागेसाठी दहा कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. आयटी पार्क विकसित करण्यासाठी महापालिकेच्या पॅनल वरील वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमावर सत्ताधारी भाजपाने आडगाव शिवारातील सर्वे क्रमांक ११०३ पैकी मधील दहा एकर जागेसह संर्वे क्रमांक ११०३, ११०१, ११०४, ११०५, ११०६, ११०९, १११०, ११११, १११२ व म्हसरूळ शिवारातील सर्वे क्रमांक ९३ ते ९५, ९७, ९८ व १०३ या ना विकास क्षेत्रात आयटी पार्कचा प्रस्ताव महासभेवर ठेवला होता. उत्तर महाराष्ट्रातील माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित युवक देशभरातील अन्य शहरांमध्ये रोजगारासाठी जातात. परंतु नाशिक मध्ये पोषक वातावरण असूनही आयटी उद्योगाचा हवा तसा विकास झालेला नाही. महापालिका क्षेत्रात ३०० लहान-मोठ्या आयटी कंपन्या असून त्यांना सवलती मिळत नाही, नाशिकमधील मुलांना मुंबई, पुण्यात आयटी क्षेत्रातील कामासाठी जावे लागते परंतू घर परवडत नसल्याचा दावा करताना महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी प्रस्ताव सादर केला होता. विरोधकांकडून थेट विरोध झाला नसली तरी प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर संशय व्यक्त केला गेला. विश्वासात न घेतल्याने भाजपचे शशिकांत जाधव, उध्दव निमसे, शितल माळोदे यांनी भाजपवरचं पलटवार केला होता. दरम्यान महासभेत मंजूरी मिळाल्यानंतर अखेरीस महापौर कुलकर्णी यांनी अंमलबजावणीसाठी प्रस्ताव सादर केला आहे.

पायाभुत सुविधा, दहा कोटींची तरतूद

आयटी पार्कसाठी चालु अंदाज पत्रकात दहा कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. पुढील वर्षी बचती मधील रक्कम पार्क विकसित करण्यासाठी लावली जाणार आहे. आयटी पार्कच्या जागेत तीस मीटरचे रस्ते विकसित करणे, मार्केट, शॉपिंग सेंटर, पाण्याची सुविधा, बस टर्मिनल आदी प्रकारच्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. पार्क विकसित करण्यासाठी महापालिकेच्या पॅनलवरील विवेक जायखेडकर, विजय साखला, धनंजय शिंदे, विजय अग्रवाल, नितीन कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.