नाशिकचा गौरवशाली इतिहास : “साडेचारशे वर्षांच्या परंपरेचा ‘पाटीलवाडा”

नाशिकला पौराणिक, ऐतिहासिक, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर असा इतिहास आहे. नाशिक अर्थात गुलशनाबाद शहराच्या इतिहासाचा हा वैभवशाली खजिना सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास या पुस्तकातील लेखांद्वारे प्रसिद्ध करत आहोत. शहराच्या चौकांतील धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन नाशिकला वैभवाप्रत नेण्यासाठी या चौकातील काही मान्यवरांची माहितीही या मालिकेतून प्रसिद्ध करत आहोत...

नाशिकच्या इतिहासाचा पुरावा इसवीसनपूर्व दोनशे वर्षे म्हणजे २६०० वर्षांपासूनचा आढळतो. इसवीसनपूर्व साधारणपणे दीडशे वर्षांपूर्वी टॉलेमी इजिप्शियन प्रवाशाने नाशिक शहरास भेट दिली. त्याने आपल्या प्रवास वर्णनात नाशिकचा धार्मिक पीठ असलेले गाव असा उल्लेख केला आहे. तसेच, जीन प्रभुसुरीजी यांच्या ग्रंथात जैन धर्माचे आठवे तीर्थंकार चंद्रप्रभस्वामी हे नाशिक येथे राहत असल्याचा उल्लेख केलेला आहे.

पुणे विद्यापीठ व डेक्कन कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूट या दोन संस्थांनी संयुक्तपणे १९५० मध्ये जुन्या गढीच्या जागेत उत्खनन केले. त्यात प्राचीन काळी या गढीच्या जागेत पक्की वसाहत असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. त्याच खोदकामात खोलवर घरांच्या पक्क्या बांधणीच्या विटांच्या भिंती, वाळू व करड्या रंगाची चिखल मिश्रणाच्या घरांसाठी तयार केलेल्या जमिनीचा भाग उत्कृष्ट स्थितीतील आढळला. मातीची भांडी व काही लोखंडी शस्त्रेही सापडली. सांडपाण्याचे कूप, पाटे-वरवंटे, जनावरांची हाडे थरांत सापडली. काही भागात तांबड्या रंगाची रोमन बनावटीची पात्रे, काचेचे मणी आढळले. यातील मातीची खापरे व तत्सम वस्तू नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या अलीकडील अद्ययावत अशा वस्तुसंग्रहालयात जतन करून ठेवल्या आहेत. यावरून नाशिकचे अश्मयुगीन वस्तीचे पुरावे उपलब्ध होतात. सातवाहनकालीन कौलेही सापडली. याच काळातील चंबुही सापडला. यावरून इसवी सन पूर्वीच्या ४०० वर्षे आधीच्या वस्तीचा भाग म्हणून संशोधनपूर्व निष्कर्ष काढण्यात आला.

ऐतिहासिक कालखंडात १३१८ पर्यंत नाशिकवर यादवांचे अधिराज्य होते. कला व साहित्य यांना या काळात आश्रय मिळून भरभराट झाली व बहुसंख्य देवदेवतांच्या मंदिरांची निर्मिती याच काळात वेगाने झाली. चौदाव्या शतकाच्या प्रारंभापासून अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर आणि २०-२५ वर्षांच्या त्यांच्या राजवटीनंतर बहामनी राजवट १३४७ ते १४९० पर्यंत नाशिक शहरावर होती आणि १४९० ते १६३६ पर्यंत निजाम सुलतानाच्या अधिपत्याखाली नाशिक होते. नाशिकच्या दक्षिण भागात त्यांनी नव्या गढीच्या जागेत राज्य व्यवस्थेसाठी प्रशासकीय वाडे बांधले. गाडगे महाराज धर्मशाळेच्या शिखरावर असलेल्या (टेकावर) वाड्यात शहाजीराजे राहत होते. तेव्हा छत्रपती शिवराय राजमाता जिजाबाईंसह वास्तव्यास आले होते, असा उल्लेख इतिहासकार भीमसेन सक्सेना यांनी केला आहे. श्रीमंत शहाजीराजे हे निजामाचे सरदार म्हणून सेवेत होते. मुघल अतिक्रमणाचा त्यांनी धैर्याने प्रतिकार केला आणि प्रशासकीय अंमल याच नव्या गढीवरील वाड्यातून त्यांनी आपल्या देखरेखीखाली केला.

हा वाडा पाटीलवाडा या नावाने आजही सुमारे ४५० वर्षांची परंपरा सांभाळीत उभा आहे. या वाड्यात नाशिकचे परंपरागत पाटील व मराठा, ब्रिटीश कालखंडातही पोलीस पाटीलकीचा मान असलेले कोठावळे-पाटील परिवार राहत आहे. कालिका मंदिराचे विश्वस्त व माजी नगरसेवक विनायकराव व आजच्या पिढीचे बाळासाहेब कोठावळे पाटीलकीची परंपरा आजही सांभाळत आहेत. या पाटील वाड्याच्या अगदी समोर नाशिकचे आराध्य दैवत असलेल्या महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. १६२७ मध्ये नगरच्या निजामशाहीचा शेवट झाला. शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या सेवेत रूजू झाले व नाशिक विभाग १६३८ मध्ये मुगल राजवटीच्या नियंत्रणाखाली आला. त्यावेळी नाशिक हा संगमनेर प्रांताचा एक भाग होता. मुघलांनी नाशिक बळकावले. तथापि, येथील वनश्री व आल्हाददायक हवा व विशेषत: गुलाबाच्या फुलांची बहरलेली फुलझाडे या बाबींमुळे प्रभावित होऊन नाशिकचे नाव गुलशनाबाद असे नामांतरित केले. पाटील वाड्याच्या अंगणातून उत्तरेकडे जर दृष्टिक्षेप टाकला, तर गोदावरी नदीतील रामकुंडाचा परिसर स्पष्टपणे दृष्टिक्षेपात येतो. अलीकडील रात्रीच्या झगमगाटात आणि रोषणाई पाहिली तर मलबार हिलवरून चौपाटीचे जे दृश्य दिसते, त्याचप्रमाणे गोदाकाठचा विशाल परिसर दिसतो.

संभाजीराजे यांच्या आश्रयाला औरंगजेबाचा पुत्र अकबर हा नाशिक येथे १८६२ मध्ये या भागात वास्तव्यास होता. नागझरी प्रवाहाच्या अगदी समोर पठाणपुरा टोकाच्या लगत दरबार दरवाजा असल्याने अद्याप या रस्त्यास दरबार दरवाजा असे नाव आहे. नागझरी हा जिवंत पाण्याचा झरा होता. त्याचे आज नाला म्हणून रूपांतर झालेले आहे. अमरधामपासून वरच्या टोकाच्या नागझरीपर्यंत प्रवाहात अळूची पाने लावली जात असत. नाशिकच्या अनेक भोजनावळी संपन्न करणार्‍या नागझरीची अळूची पाने ही आजही प्रसिध्द आहेत. नाशिक नगरपालिकेचा टाकळी जकात नाका याच विभागात होता. नाशिक गावाची हद्द येथे संपत असे. यापासून एका मैलावर ज्याठिकाणी सध्या रंगूबाई जुन्नरे हायस्कूल आहे व सुंदर उद्यान आहे, तो द्वारका ते कन्नमवार पुलाचा विकसित भाग हा पूर्वी नाशिक शहरातील कचरा, मलमूत्र यांचा डेपो होता, हे सांगितले तर नव्या पिढीस आश्चर्य वाटेल. मलमूत्रापासून खत करण्यासाठी सुमारे पाच एकर जागेत सुमारे तीस फूट चौरस विभागाचे खड्डे करून त्यातील तीन विभागात गावातील केरकचरा जमा करून तो जाळला जात असे. त्याच्या राखेचा चार ते पाच इंच थर इतर प्रशस्त जागेत साठविलेल्या मलमूत्रावर पसरविला जात असे. पहाटे चार ते नऊपर्यंत याकामी पाच सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. मिश्रणानंतर वाळून तयार झालेल्या खतांचे ढिगारे उभारले जाऊन शेतकर्‍यांना ते विकले जात असत. त्याकाळी शेतकर्‍यांमध्ये या खताला मोठी मागणी होती. १८७२ मध्ये एक सफाई कर्मचारी अपघाताने मैलाच्या साठ्यात सापडला व मृत्युमुखी पडला. त्याच्या विधवेस व मुलास शंभर रूपये नगरपालिकेने ठरावान्वये दिले, असाही नगरपालिका दप्तरात उल्लेख आहे.

पूर्वापार चैत्र शुद्ध एकादशीस निघणार्‍या श्रीराम रथाच्या पुढे पालखी वाहणारे भगवान कहार यांचे कुटुंबिय आजही याच कथडा विभागात राहत आहेत. महादू दुर्गाजी क्षीरसागर, इंदूमती कहार, गो. द. गोडे, शेख नसीर सुलतान ही मंडळी या भागात समाजसेवक म्हणून प्रसिध्द होती. कथड्यासमोरील बाग म्हणजे भोई गल्ली, नाशिकच्या जुन्या उत्सवाप्रसंगी, मिरवणुकीप्रसंगी विशेषत: कलगीतुरा यासाठी हा भाग नावाजलेला होता. सुप्रसिध्द विडी कारखानदार शंकर गोविंद कांबळे, भारत मार्केटिंगचे फकीरराव सोपे, स्वातंत्र्यसैनिक व हुतात्मा स्मारक समितीचे झुंजार अध्वर्दू कचरू मामा झिंटे, नगरसेवक नामदेव सोपे, नगरपालिकेचे झिटे, शिंपी समाजाचे अग्रणी मंडप सजावटीचे कंत्राटदार डी. वारे गणोरे, कलगीतुर्‍याचे कलावंत फकीरराव सोपे, भगूर दरवाजा विभागातील शिक्षण मंडळाचे प्रधान सचिव माधव काठे, सुप्रसिध्द अकाउंटंट मोतीरामजी क्षीरसागर, चपला बुटांचे नाशिकमधील प्रसिध्द व्यापारी म्हसूजी आहेर, डॉ. कानडे यांचे बालपण व वास्तव्य याच परिसरात आहे.

सुप्रसिध्द राजकीय -सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक मागास वर्गाचे नेते व इंदिरा गांधी यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रभावळीतील दिग्गज हिरामण चतरू मोहेकर, उपाख्य बाबूजी यांचे वास्तव्य याच पठाणपुरा भागात आहे. अली मामू तांगेवाले हे व्यवसायाने टांगा हाकणार्‍या कार्यकर्त्यास आपला प्रतिनिधी म्हणून निवडून देणारे सर्व समाजाचे मतदार म्हणूनदेखील या विभागाने आपला विक्रम नोंदविला आहे. या जुन्या नाशिकमधील बहुसंख्य मुस्लीम वस्तीच्या मध्यभागी असलेल्या चव्हाटा या भागात माळीसाळी आणि तत्सम समाजाची मुख्य वस्ती होती.