घरमहाराष्ट्रनाशिकशिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादी तळ्यात-मळ्यात

शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादी तळ्यात-मळ्यात

Subscribe

राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही महाशिवआघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक रविवारी घेण्यात आली.

राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही महाशिवआघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक रविवारी घेण्यात आली. त्यात महत्त्वाची पदे मिळावीत, अशी अपेक्षा दोघाही पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली. तर शिवसेना आणि काँग्रेस पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत सेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसने संमती दर्शवली. राष्ट्रवादीने मात्र अद्याप आपली भूमिका जाहीर केली नसून, या पक्षाचे पदाधिकारी ‘तळ्यात-मळ्यात’ असल्याचे कळते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यात काँग्रेस, राष्ट्रवादीला महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतीपद दिल्यास शिवसेनेला पाठिंबा देऊ, अशी अट टाकण्यात आल्याचे कळते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष यांनी एकत्र राहण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेवक शाहू खैरे, गुरुमित बग्गा, गजानन शेलार, सुषमा पगारे, राजेंद्र महाले, समीना मेमन, शोभा साबळे यांच्यासह संजय साबळे, नरेश पाटील, बबलू खैरे आदी उपस्थित होते.

हे वाचा – राष्ट्रवादीच्या बैठकीत फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ डायलॉगची चर्चा

- Advertisement -

महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित निर्णय घेतील, असे बोलले जात असले तरीही या दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी स्वतंत्रपणे बैठका घेतल्या. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, नगरसेवक सुधाकर बडगुजर, गटनेता विलास शिंदे यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, शाहू खैरे, डॉ. हेमलता पाटील, समिना मेमन, नरेश पाटील आदींची बैठक रविवारी एका हॉटेलमध्ये झाली. त्यात काँग्रेसने सेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केल्याचे कळते. याशिवाय सेना पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांबरोबरही बैठका घेतल्या. मात्र, एका अपक्ष नगरसेवकाने राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना विश्वासात घेऊन पाठिंबा देण्याचा निर्णय स्थगित ठेवल्याचे कळते. या अपक्ष नगरसेवकाला उपमहापौरपदाचे डोहाळे लागल्याचे कळते. शिवसेनेला महापौरपद देताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला प्रत्येकी एक याप्रमाणे उपमहापौर, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपद देण्याचे निश्चित करण्यात आले.

काँग्रेस नगरसेवक जाणार अज्ञातस्थळी

काँग्रेसचे सहा नगरसेवक सोमवारी, १८ नोव्हेंबर रोजी अज्ञातस्थळी रवाना होणार आहे. या नगरसेवकांनी शिवसेनेच्या नगरसेवकांसोबत जावे, असा प्रस्ताव होता. मात्र, काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी त्यास नकार दिला. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीने काँग्रेससोबत सहलीला जाण्यास नकार दिल्याचे कळते.

- Advertisement -

महाशिवआघाडीत मिठाचा खडा?

राष्ट्रवादीही पाठिंबा देण्याच्या मानसिकतेत असून अपक्षांमधील एक नगरसेवक मात्र, उपमहापौरपदासाठी हटून बसल्याचे कळते. त्यामुळे महाशिवआघाडीत हा नगरसेवक ‘बिघाडी’ करतो की काय अशी भीती सेनेच्या पदाधिकार्‍यांना आहे. त्यामुळे या नगरसेवकाची समजूत काढण्यासाठी पदाधिकार्‍यांना आता प्रयत्न करावे लागत आहेत. हा नगरसेवकच महाशिवआघाडीत मिठाचा खडा टाकत असल्याचे एका पदाधिकार्‍याने सांगितले.

मनसे पदाधिकार्‍यांनी घेतली राज यांची भेट

महापालिकेत मनसेचे पाच नगरसेवक असून महापौरपदाच्या निवडीत या पाचही नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यासंदर्भात संबंधित नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांनी रविवारी मुंबईत जाऊन पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत नक्की काय निर्णय झाला याविषयी सर्वांनीच मौन बाळगले आहे. असे असले तरीही मनसेच्या नगरसेवकांमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन दोन गट पडल्याचे कळते. एका गटाला उपमहापौरपद हवे आहे तर दुसरा गट स्थायी सभापतीपदासाठी हटून बसला आहे. महत्त्वाचे म्हणजे महाआघाडीत मनसेला सामावून न घेतल्याने काही पदाधिकारी महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा आग्रह धरत आहेत.


हेही वाचा – रक्त साठवणीत नायर हॉस्पिटल बेस्ट!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -