घरमहाराष्ट्रनाशिकराष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना भुजबळांची अ‍ॅलर्जी?

राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना भुजबळांची अ‍ॅलर्जी?

Subscribe

राज्यपालांच्या सटाणा दौर्‍यातील अनुभवाने समर्थकांची नाराजी

बागलाणमध्ये कोणत्याही निवडणुका आल्या की ओबीसीच्या एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवून ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यासह बागलाणच्या भुजबळ समर्थकांना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी अक्षरशः डोक्यावर घेतात. असे असताना नुकत्याच राज्यपालांच्या दौर्‍यात मात्र पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सटाणा शहरात आले. मात्र, पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवलीच, शिवाय पक्षाच्या एकाही पदाधिकार्‍याने त्यांचे स्वागत केले नाही. पदाधिकार्‍यांच्या या कृतीमुळे आमच्या नेत्याची एवढी अ‍ॅलर्जी का, असा सवाल करत भुजबळ समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

बागलाण तालुका हा भुजबळप्रेमी असल्याचे अनेक निवडणुकांतून अधोरेखित झाले आहे. बागलाण तालुक्यात ओबीसींची संख्या बर्‍यापैकी असल्याने साहजिकच तालुक्यात त्यांचा प्रभाव आहे. निवडणूक आली की ओबीसी मतांवर डोळा ठेवून असलेले राष्ट्रवादीचे इच्छुक भुजबळांपुढे अक्षरशः लोटांगण घालतात, हे सर्वश्रुत आहे. भुजबळदेखील सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आपले बळ पणाला लावतात, याचा अनुभव बागलाणच्या असंख्य कार्यकर्त्यांनी घेतला आहे. ओबीसी नेते असले तरी भुजबळ राष्ट्रवादीचे नेते म्हणून मराठा कार्यकर्त्यांनादेखील समान न्याय देण्याचा प्रयत्न करतात. याचे उदाहरण म्हणजे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे. एवढे असूनही देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असलेल्या भुजबळांच्या स्वागतासाठी ना पक्षाचे तालुकाप्रमुख ना पदाधिकारी हजर राहिले.

- Advertisement -

प्रोटोकॉलनुसार आमदार बोरसेंनी स्वागत केले. कृषीमंत्री दादा भुसेंचेही जंगी स्वागत झाले. मात्र, राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी भुजबळांचे स्वागत तर केले नाहीच, शिवाय कार्यक्रमाकडे सपशेल पाठ फिरवली. स्थानिक पदाधिकार्‍यांच्या या भूमिकेमुळे समता परिषद व भुजबळ समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

कार्यक्रमाला न जाण्याचे फर्मान?

एका पुढार्‍याने भाजप-सेनेचा कार्यक्रम असल्याने त्या कार्यक्रमाला कुणीही जाऊ नये, असे फर्मान काढल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. त्या पुढार्‍याच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी निश्चितच चव्हाट्यावर आली आहे.

शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारकाचा कार्यक्रम धार्मिक असल्यामुळे सर्वच पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना व्यक्तीगत निमंत्रण देण्यात आले होते. त्यात राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांसह माजी आमदार संजय चव्हाण यांनादेखील तीन वेळा आपण निमंत्रण दिले होते.
– सुनील मोरे, नगराध्यक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -