सेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची रंगीत तालीम

देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना बूस्ट देण्याचा केला प्रयत्न

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रचलित असलेल्या देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मेळावा घेवून कार्यकर्त्यांना बूस्ट देण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतलेला मेळावा असो किंवा यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केलेल्या कामांमुळे शिवसैनिकांच्या मनात हलकल्लोळ सुरू झाला आहे. राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या वाढत्या बळामुळे शिवसेनेचे माजी मंत्री बबन घोलप व सुपुत्र माजी आमदार योगेश घोलप यांच्या गटात दिवसेंदिवस अस्वस्थता वाढतांना  दिसून येते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून, शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाल्याने घोलप कुटुंबाला पराभवाचे शल्य अधिक बोचत राहिले आहे. एकतर पराभवामुळे मंत्रीपदाच्या शर्यतीतून बाद झाले आणि दुसरी म्हणजे ऐनवेळी भाजपमधून आयात सरोज अहिरेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. त्यांच्या अनुभवाच्या तुलनेत शिवसेनेने त्यांना हलक्यात घेतले आणि पराभवाचे धनी व्हावे लागले. विशेष म्हणजे नवख्या उमेदवाराकडून पराभूत होण्याचे दु:ख अधिक असते. आताही शिवसेना तीच चूक पुन्हा करताना दिसत आहे. आमदार आहिरे निवडून आल्या तरी फारसा प्रभाव पाडू शकणार नाहीत, असा त्यांचा अंदाज असला तरी राज्यातील मातब्बर नेत्यांना मतदारसंघात घेवून येण्यात त्यांना आजवर यश आलेले दिसून येते. त्यामुळे शिवसेनेला विरोध करावासा वाटत असला तरी मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा असल्यामुळे थेट विरोधातही जाता येत नाही. ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ अशी येथील शिवसैनिकांची अवस्था झाली आहे. राष्ट्रवादीला या मतदारसंघात विजय मिळाल्यानंतर शरद पवार यांनी तर सरोज आहिरेंना चक्क मुलगी म्हणुनच संबोधले.

त्यामुळे पवार कुटुंबाशी जिव्हाळ्याचे नाते तयार झालेल्या या आमदारांवर विशेष जबाबदारी टाकत विधीमंडळातील महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीची मोठी जबाबदारी दिली. जितके यश मोठे तितकी जबाबदारी मोठी, कधी नव्हे देवळालीत विजय मिळालेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या अपेक्षा इतक्या मोठ्या आहेत की कार्यकर्त्यांना धीर धरण्यासाठी खुद्द प्रदेशाध्यक्षांना सार्वजनिकरित्या बोलण्याची वेळ आली. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी केलेला दौरा हा आगामी महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने देवळालीतून मतदान झाले. त्याच धर्तीवर ८८ खेडे गावांत जेष्ठांची गाव कमिटी स्थापन करावी, प्रत्येक बुथ कमिटीत 10 लोक असावेत, त्यांनी किमान शंभर लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, अशा प्रकारे पूर्ण मतदारसंघात २८८ बूथ आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे काम केले तर नक्कीच हक्काचा मतदारसंघ होण्यास मदत होईल, अशी व्यवरचना राष्ट्रवादीने येथे आखली आहे. राष्ट्रवादीच्या तालुका, विधानसभा, युवक, डॉक्टर, अपंग, वकील, हॉकर्स आदी सेलच्या सर्वच पदाधिकार्‍यांची माहिती थेट प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे असल्याने त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.

थेट कार्यकर्त्याला प्रदेशाध्यक्षांचा फोन येणे हे गावातील लोकांच्यादृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे आणि हाच ‘बूस्टर डोस’ कार्यकर्त्यांना सध्या मिळत आहे. त्यामुळे नाही म्हटले तरी शिवसेनेचा बालेकिल्ला भेदण्याचे काम राष्ट्रवादीकडून केले जात आहे. यात जनमत हा सर्वात महत्वाचा भाग समजला जातो. सरोज आहिरे यांनी विधानसभा पाठवून आता दोन वर्षे पूर्ण होत आले आहेत. त्यामुळे त्यांचा करिष्मा अजूनही कायम आहे की, देवळाली मतदारसंघ हा घोलप कुटुंब व शिवसेनेशी बांधिल आहे, हे येणार्‍या महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत स्पष्ट होईल.