घरमहाराष्ट्रनाशिकपिशवीबंद बाळाचा श्वासासाठी आक्रोश

पिशवीबंद बाळाचा श्वासासाठी आक्रोश

Subscribe

नासर्डी पुलाजवळ बेवारस आढळलेल्या बाळाला तरुणीच्या सतर्कतेने जीवदान

पायी जाणाऱ्या तरुणीला एका प्लास्टिकच्या पिशवीत हालचाल होताना दिसते… जिज्ञासेने काहीशी भीतभीत पिशवीजवळ जात, ती पिशवी उघडते आणि आत बघते तर अवघ्या काही तासांपूर्वी जन्मलेली ‘नकोशी’ त्यात प्रत्येक श्वासासाठी आक्रोश करत धडपडत असते. अर्भकाची माता एवढी निर्दयी की, नाळही न कापता तिने बाळाला फेकून दिलेलं असतं. अशाही अवस्थेत कसला विचार न करता ही तरुणी चटकन बाळाला बाहेर काढून तातडीने सुरक्षित ठिकाणी घेऊन जाते आणि सहकाऱ्यांच्या मदतीने या गोंडस बाळाला सिव्हीलमध्ये सुखरुप दाखल केलं जातं…

वडाळा गाव रस्त्यावरील नासर्डी पुलालगत असलेल्या कचऱ्यात बुधवारी, १५ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एका दिवसाची लहानगी पिशवीत टाकून फेकून दिलेली आढळली. सेवा संस्थेच्या वतीने शाळाबाह्य मुलांना शिकविण्याचे काम करणाऱ्या मंदा शिंदे ही तरुणी वडाळा गावातील शाळेतून द्वारका सर्कल भागातील संस्थेच्या कार्यालयाकडे पायी येत होती. डोक्यावर टळटळीत ऊन असतानाही सजगतेमुळे तिला नासर्डी पूलालगत कचऱ्यात टाकलेल्या एका पिशवीत हालचाल होताना दिसली. काहीशी घाबरतच मोठ्या हिंमतीने तिने ही पिशवी उघडल्यानंतर आत रक्ताने माखलेलं बाळ दिसलं. मंदाने तातडीने बाळाला बाहेर काढून सुरक्षित जवळ घेत कार्यालय गाठलं. स्वतःच्या कपड्यांचा जराही विचार न करता तीने बाळाला स्वच्छ केलं. बाजूला असलेल्या सुभाष सदावर्ते, संस्थेतील बाबाजी केदारे यांच्या मदतीने संस्थेचे अध्यक्ष अॅड. राजपालसिंग शिंदे यांनाही घटनेची माहिती देत बोलावून घेतलं. नाळ तशीच असल्याने बाळाला तातडीने उपचारांची गरज लक्षात घेत रिक्षाने हे सर्व जिल्हा शासकीय रुग्णालयात आले. विशेष म्हणजे माणुसकी दाखवत रिक्षाचालकाने पैसेही घेतले नाही.

- Advertisement -

विशेष शिशु अतिदक्षता विभागातील (एसएनसीयू) डॉ. दिनेश ठाकूर व बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रेयस पटेल यांनी बाळावर प्राथमिक उपचार करत दाखल करून घेतलं. त्यानंतर कागदपत्रांच्या पूर्ततेचं काम सुरू झालं. रंगाने गोरी आणि गुबगुबीत या लहानगीला कचऱ्यात टाकण्याएवढी तिची माता निर्दयी कशी, अशीच चर्चा या कक्षात सुरू होती. दरम्यान, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस कर्मचारी क्षिरसागर हे पुढील तपास करत आहेत. मंदाच्या सतर्कतेने एका बाळाला जीवन मिळाल्यानं, रुग्णालयातील डॉक्टरांनीही मंदाच्या या कामगिरीचं कौतुक केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -