घरक्राइमअल्पवयीनांची नवी फॅशन; अवैध शस्त्र बाळगण्याची पॅशन

अल्पवयीनांची नवी फॅशन; अवैध शस्त्र बाळगण्याची पॅशन

Subscribe

पुन्हा तलवारी, कोयत्यांसह तिघे युवक ताब्यात; शहरात शस्त्र पुरवठा करणार्‍यांच्या मुसक्या आवळण्याची गरज

तलवार बाळगणे बनतोय प्रतिष्ठेचा विषय

गेल्या काही वर्षांपासून नाशकात वाढदिवसाला तलवारीने केक कापणे अत्यंत प्रतिष्ठेचा विषय बनल्याचे दिसून येत आहे. अगदी मिसुरड्याही न फुटलेल्यांकडून तलवारी घेऊन नंगानाच सुरू असल्याने गुन्हेगारीला आमंत्रण दिले जातेय. मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांतून तसेच महाराष्ट्रातील नांदेडहून सर्रासपणे तलवारी नाशकात आणल्या जात असल्याचे दिसून येते. अनेक ‘भाईंनी’ तर प्रतिष्ठा (इमेज) म्हणून स्वत:जवळ बाळगल्याचे दिसून येते. पोलिसांकडून वारंवार आवाहन करण्यात येऊनही तलवारी बाळगल्या जात असल्याने पोलीस यंत्रणेचा धाक नसल्याने वारंवार अधोरेखित होते. दरम्यान, पोलीस विभागाकडून महिन्याच्या प्रारंभी सुरू करण्यात आलेली ‘सर्च मोहीम’ शिथील झाल्याने आता पुन्हा गुन्हेगार बिळातून बाहेर येत असल्याचेही दिसून येत आहे.

नाशिक : शहरात अल्पवयीनांकडून होणार्‍या गुन्हेगारी घटनांची मालिकाच सुरू असताना आता या अल्पवयीनांकडे अत्यंत धारदार शस्त्रे, अवैध शस्त्रे आढळून येत असल्याने पोलीस यंत्रणांपुढे आवाहन उभे ठाकले आहे. गेल्या आठवड्यात तीन घटनांमध्ये तरुणांकडे तलवारी, कोयते अन् चॉपरसारखी घातक हत्यारे आढळून आल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यात बुधवारी पुन्हा सात तलवारींसह तिघा युवकांना ताब्यात घेण्यात आल्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रे नाशकात येतात तरी कुठून आणि शहरभरात पोलिसांचे ‘सर्चिंग’ सुरू असताना गुन्हेगारांकडून ही शस्त्रे बाळगली जातातच कशी, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

- Advertisement -

नाशकात बुधवारी (दि. २९) अवैधरित्या सात प्राणघातक धारदार तलवारी बाळगणारे तिघेजण पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहरच्या पोलीस अंमलदार विशाल देवरे यांना गुन्हे प्रतिबंधक गस्तीदरम्यान गुप्त बातमीदारांमार्फत काझी गढी, अमरधामरोड येथे राहणारा विपुल मोरे व त्याचे साथीदार यांनी धारदार तलवारी बेकायदेशीररित्या आणल्या असून त्या घरात लपवून ठेवल्या असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रवींद्र बागूल, प्रदीप म्हसदे, आसिफ तांबोळी, विशाल देवरे, प्रवीण वाघमारे, महेश साळुंके, प्रशांत मरकड, आण्णासाहेब गुंजाळ अशांना मिळालेल्या बातमीप्रमाणे कारवाईसाठी रवाना केले. त्यानुसार अमरधाम रोडवरील काझीची कढी येथे जावून विपुल अनिल मोरे (वय २८, रा. शितळा देवी चौक, काझीची गढी, म्हसोबा मंदिरासमोर, अमरधामरोड नाशिक यास त्याचे राहते घरातून ताब्यात घेतले.

त्याने व त्याच्या मित्रांनी बेकायदेशीररित्या आणलेल्या तलवाररंबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की चेतन रमेश गंगवाणी, गणेश राजेंद्र वाकलकर अशांनी उज्जैन, (रा. मध्यप्रदेश) येथून सात तलवारी बेकायदेशीररित्या आणल्या आहेत. यातील ४ तलवारी विपुलच्या घरात, तर १ तलवार चेतन गंगावाणी, २ तलवारी गणेश वाकलकर याच्या घरात सापडल्या. त्याच्या या कबुलीमुळे विपुल अनिल मोरे (वय २८, रा. शितळादेवी चौक, काझीची गढी, म्हसोबा मंदिरासमोर, अमरधामरोड, नाशिक), चेतन रमेश गंगवाणी (वय २६, रा. काझीची गढी, शितळादेवी चौक, अमरधामरोड, नाशिक), गणेश राजेंद्र वाकलकर (वय २२, रा. काझीची गढी, शितळादेवी चौक, अमरधामरोड, नाशिक) यांच्याकडून एकूण सात हजार रुपयांच्या ७ तलवारी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संजय बारकुंड, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रवींद्र बागूल, प्रदीप म्हसदे, आसिफ तांबोळी, विशाल देवरे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, महेश साळुंके, अण्णासाहेब गुंजाळ, समाधान पवार यांनी केली.

- Advertisement -

कोयता पॅटर्न ठरतोय जीवघेणा

शहरात जून महिन्यात झालेल्या घटनांचा आढावा घेतला असता बहुतांश गुन्हेगारी घटनांमध्ये कोयत्याचा वापर केला गेल्याचे दिसून येते. तलवारी, चॉपर, गावठी कट्टे, तसेच अन्य अवैध शस्त्र मिळवण्यात अडचणी येत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून बाजारपेठांमध्ये अगदी सहजपणे उपलब्ध होणार्‍या कोयत्यांना पसंती दिली जातेय. अगदी १५० ते २०० रुपयांना मिळणारा हा कोयता आज अनेकांच्या जीवासाठी धोकादायक ठरतोय.

या महिन्यात ४ जून रोजी पंचवटीत क्रिकेट खेळणार्‍या एका युवकावर दोघांनी कोयत्याने हल्ला केला होता. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आला होता. यानंतर ७ जून रोजी निलगिरी बाग परिसरात एका तरुणाच्या मागे लागलेल्या कोयता व अन्य शस्त्रधारी टोळक्यामुळे जखमी अवस्थेतील हा युवक कॅनॉलमध्ये पडून मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली होती. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे या घटनेत सहा ते सात जणांनी हल्ला चढवल्याने हा युवक कॅनॉलकडे पळत होता, यादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

लगेचच ८ जूनला अंबड औद्योगित वसाहतीत कोयत्याने उद्योजकाचा खून करण्यात आला होता. यातील चौघा आरोपींनी लहान-मोठे कोयते बाळगून हल्ला केला होता. यानंतर ९ जूनला नाशिकरोडला रात्रीच्या सुमारास रुग्णवाहिकेवरील डॉक्टरला कोयत्याने जखमी करत त्याचे पैसे अन् मोबाईल लुटण्याची घटना घडली होती. यातही दुचाकीवर आलेल्या दोघांनी कोयत्याने डॉक्टरच्या हातावर वार केले होते. १२ जूनला एका युवतीची छेड काढल्याच्या जाब विचारणार्‍या तिच्या भावाला तिघा युवकांनी कोयत्याने तसेच वीट डोक्यात मारून हल्ला केला होता. यात या युवतीचा भाऊ गंभीर जखमी झाला होता. यानंतर १५ जूनला सिडकोतील शिवपुरी चौक परिसरातील हाणामारीतही तलवारी, कोयत्यांचा वापर केला गेला होता. याच दिवशी सायंकाळच्या सुमारास एका विधीसंघर्षीत बालकाकडे तब्ल चार अत्यंत धोकादायक शस्त्रे आढळ्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. तीन चॉपर, एक कुकरी हस्तगत करण्यात आली होती. बुधवारी (दि. २२) ओझर पोलिसांच्या कारवाईत घरफोडीच्या तयारीतील दोघा युवकांना तलवारी, कोयत्यांसह करण्यात आली होती. यानंतर शनिवारी (दि. २५) भरदिवसा एका १४ वर्षीय बालकावर चौघांनी कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरात दहशत माजली होती. भरदिवसा कोयते घेऊन रस्त्यावर पळणार्‍या या तरुणांमुळे हा मुलगा गंभीर जखमी झाला होता. यानंतर सोमवारी (दि. २७) रोजी नाशिकरोडच्या मुक्तीधाम मंदिर परिसरातील इगल उद्यानाजवळ प्रेमप्रकरणातून एका अल्पवयीन मुलाला त्याच्या मैत्रीणीच्या बॉयफ्रेण्डसह दोघांनी कोयत्याने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. यात जखमी मुलगा अन् हल्ले करणारे सर्व मुले अल्पवयीन होते. याच दिवशी सोमेश्वर कॉलनीतील उद्यानाजवळही मित्रांच्या वादात मुलांनी कोयत्याचा वापर केल्याची घटना ताजीच आहे.

कोयतेच का ?

कुठल्याही बाजारपेठेजवळ किंवा शहरातील भंगार बाजारांमध्ये अगदी १५० ते दोनशे रुपयांपर्यंत कोयते उपलब्ध होतात. अगदी मोठ्यात मोठा आणि धारदार कोयताही चारशे रुपयांपर्यंत मिळतो. त्यासाठी कुठलीही विचारणा केली जात नाही ना कुठला परवाना लागतो. कुणीही हा कोयता सहज घेऊ शकत असल्याने सर्वाधिक गुन्ह्यांमध्ये कोयते वापरले जात असल्याचे आजवरच्या घटनांमधून सहज दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -