घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकसाठी दोन लाख अँटिजेन किट खरेदी, पालिका स्थायीचा निर्णय

नाशिकसाठी दोन लाख अँटिजेन किट खरेदी, पालिका स्थायीचा निर्णय

Subscribe

४५ रुपयांत मिळणार्‍या अँटिजेन किटची खरेदी महापालिकेने यापूर्वी ५०४ रुपयांना केली कशी हा प्रश्न मात्र अनुत्तरित

नाशिक – कोरोनाच्या संभावित तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन लाख अँटिजेन किट खरेदीच्या वैद्यकीय विभागाच्या कार्योत्तर मंजुरीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने शुक्रवारी (दि.१) हिरवा कंदिल दिला. मात्र, निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर ४५ रुपयांत मिळणार्‍या अँटिजेन किटची खरेदी महापालिकेने यापूर्वी ५०४ रुपयांना कशी केली आणि या जादा दराने खरेदी केलेल्या पाच लाख किटचा विनियोग कसा झाला याविषयी समीना मेमन, सलीम शेख यांचा अपवाद वगळता समितीच्या सर्वच सदस्यांनी चुप्पी साधली.

कोरोना महामारीच्या काळात महापालिकेने तब्बल पाच लाख अँटिजेन किटची खरेदी केली. सुरुवातीला तब्बल ५०४ रुपये प्रतिकिट दराने या किटची खरेदी केली गेली. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरने मान्य केलेल्या दरानुसारच ही खरेदी केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी निविदा न काढता ही खरेदी केली गेली. कोरोनामुळे कोणीही या खरेदीविषयी संशय व्यक्त केला नाही. मात्र तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने दोन लाख अ‍ॅन्टीजेन किटच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली तेव्हा यापूर्वी ५०४ रुपयांना मिळणारे अ‍ॅन्टीजेन किट अवघ्या ४५ रुपयांना प्राप्त झाले. विशेष म्हणजे महापालिकेने यापूर्वी ज्या हाफकिन बायोफार्माकडून किटची खरेदी केली. त्या कंपनीने देखील या निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. त्यांचे दर ८९.६० रुपये प्रतिकिट इतके होते. त्यामुळे त्यांना जादा दरामुळे कीट पुरवठ्याचा ठेका मिळू शकला नाही.

- Advertisement -

शुक्रवारी सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत यासंदर्भातील प्रस्ताव वैद्यकीय विभागाने कार्योत्तर मंजुरीसाठी सादर केला. या सभेत यापूर्वी झालेल्या अ‍ॅन्टीजेन किटच्या जादा दराविषयी तसेच पाच लाख किटच्या विनियोगाविषयी चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु गंगापूर धरणावर महापौरांच्या हस्ते होणार्‍या जलपूजनाच्या कार्यक्रमाला होणारा विलंब सभागृहाच्या निदर्शनास आणून देत यासह सभापटलावरील विकासकामांच्या सर्व प्रस्तावांना सभापती गिते यांनी मंजुरी दिली. त्यामुळे अ‍ॅन्टीजेन किट खरेदीविषयी चर्चा होवू शकली नाही.

दुजाभाव केला जात असल्याचा दिवेंचा आरोप

नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक २३ मधील अशोकामार्गालगत वाहणार्‍या पावसाळी नाल्यात आरसीसी पाईप टाकण्याच्या प्रस्तावाला कॉँग्रेसचे राहुल दिवे यांनी विरोध दर्शविला. हाच नाला पुढे प्रभाग क्रमांक १६ मधून वाहत असून उघड्यावरील या नाल्यामुळे उठणार्‍या दुर्गंधीकडे लक्ष वेधत सदर नाला पाईप टाकून बुजविण्याची अनेक वर्षांची मागणी मान्य होत नाही. मग महापौरांच्या प्रभागातील नाल्याबाबत वेगळा न्याय कसा, असा सवाल दिवे यांनी केला. यावर कुणावरही भेदभाव केला जाणार नाही, असे सभापती गिते यांनी सूचित केल्यानंतर सदर कामाच्या ठिकाणी अधिकार्‍यांसमवेत संयुक्त भेट देण्याच्या अटीवर दिवे यांनी प्रस्तावाला सहमती दर्शविली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -