लोकलज्जेस्तव तक्रारीच दाखल नाहीत

न्यूड कॉलिंगच्या माध्यमातून हायटेक तरुणींनी नाशिक शहरातील ३२ हून अधिक तरुणांना जाळ्यात ओढले असून, त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, समाजात प्रतिष्ठा, मान-सन्मानाला धोका पोहोचेल, या विचाराने सर्वांनी नाशिक शहर सायबर पोलिसांकडे तक्रार केली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

नाशिक शहरात लॉकडाऊनमुळे ऑनलाईन व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. मोबाईलमध्ये इंटरनेट सुविधा असल्याने अनेकजण ऑलनाईन व्यवहार करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान जितके फायदेशीर असले तरी तितकेच धोकादायक आहे. त्याचे विपरीत परिणाम आता समोर येत आहेत. मोबाईलवर इंटरनेट सर्फिंग करताना नाशिक शहरातील अनेकांना अश्लिल मेसेज, व्हिडीओच्या लिंक येत आहेत. त्यातून काही आंबट शौकिन त्यावर क्लिक करत आहेत. भावनांवर नियंत्रण ठेवता येत नसल्याने अनेकजण अनोळखी तरुणींवर विश्वास ठेवत आहेत. तसेच, आधुनिक तंत्रज्ञान कसे हाताळायचे, हे माहिती नसलेले तरुण नको त्या लिंकवर क्लिक करत आहेत. त्यातून अनोळखी तरुणी त्यांच्याशी भावनिक चॅटिंग करुन अश्लिल संवाद, न्यूड कॉलिंग करत ब्लॅकमेल करत आहेत. अनेकांना फसवणूक होत असल्याचे उशीरा लक्षात आले तरी ते लोकलज्जेस्तव आपबिती कोणासही सांगत नाही. ती संधी तरुणी साधत पीडित तरुणांच्या बँक खात्याची गोपनीय मिळवत आहेत. तसेच, ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत आहेत.

फसवणुकीसाठी हायटेक तरुणी भावनिक चॅट आणि मग न्यूड व्हिडीओ कॉल करण्याची मोडस ऑपरेंडी वापरली असल्याचे अनेकांना उशीरा समजत आहेत. मात्र, तोपर्यंत संबंधित तरुणीने तरुणांना लुटून गायबही झालेली आहे, असल्याचे पीडित तरुणांच्या अनुभवातून समोर आले आहे.

तरुणी फेसबुक मेसेज, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढत आहेत. त्यांना ब्लॅकमेल करत ‘पैसे द्या अन्यथा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही या तरुणी देत आहेत. संबंधित तरुणी फेसेबुक मेसेंजर अ‍ॅपवर अनोळखी तरुणांना भावनिक मेसेज पाठवत आहे. अनेकांनी फसवणुकीची नवीन फंडा माहिती नाही. ते तरुणीचा आकर्षक फोटो पाहून झटपट प्रतिसाद देत आहेत. ती संधी साधत न्यूड कॉलिंगवेळी मोबाईल स्क्रिन रेकॉर्ड करत आहेत. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. अनोळखी तरुणीने भावनिक संवाद साधला तरी तरुणांनी प्रतिसाद देवू नये. अनोळखी असल्याची खात्री होताच संवाद करणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

परराज्यातील हायटेक तरुणी न्यूड कॉलिंग करुन नाशिक शहरातील तरुणांना ब्लॅकमेल करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तरुणींनी धमकी दिली पीडित तरुणांनी घाबरुन जावू नये. मदतीसाठी तात्काळ पीडित तरुणांना नाशिक शहर सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. संबंधित तरुणांची नावे गोपनीय ठेवली जातील.

– देवराज बोरसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे