घरमहाराष्ट्रनाशिकलोकसभेसाठी उमेदवारी अर्ज आजपासून

लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज आजपासून

Subscribe

अर्ज भरताना घेण्याच्या दक्षतेबाबत रंगीत तालीम

नाशिक लोकसभा मतदारसंघात चार टप्प्यात मतदान होणार असून, यासाठी उद्या (ता. २) एप्रिलपासून उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. नाशिकसाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी अपर आयुक्त निलेश सागर निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकार्‍यांनी पोलीस आयुक्तांसमवेत कार्यालय परिसराची पाहणी करत निवडणूक अर्ज भरताना घ्यावयाच्या काळजीबाबत रंगीत तालीम घेतली. निवडणूक प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

यावेळी पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी म्हणाले, उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांकडून रॅली काढण्यात येते. या रॅलीमध्ये अवघी तीन वाहने वापरण्याचे बंधन घालण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे अर्ज दाखल करताना उमेदवारासह पाच जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचे निर्देश दिले आहेत. नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघांसाठी ९ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. अर्जांची छाननी १० एप्रिलला होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १२ एप्रिलपर्यंत मुदत आहे. या मतदारसंघांसाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून उमेदवारांसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्यानंतर अधिकार्‍यांकडून अर्जाची तपासणी केली जाईल. त्यानंतर उमेदवारासोबत फक्त पाच व्यक्तीच अर्ज दाखल करण्यासाठी येऊ शकतील.

- Advertisement -

जिल्ह्यातील ४७२० मतदान केंद्राकरता आवश्यक मतदान यंत्रे प्रशासनाला प्राप्त झाली असून पारदर्शक मतदानाकरता या यंत्राची सरमिसळ प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. अधिकार्‍यांचे प्रशिक्षण आयोजित करून त्यांना संपूर्ण मतदान प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही प्रशासनाने सुक्ष्म नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, निवडणूक तहसीलदार प्रशांत पाटील उपस्थित होते.

असा आहे कार्यक्रम

  • २ एप्रिल उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात
  • ९ एप्रिल : उमेदवारी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक
  • १० एप्रिल : उमेदवारी अर्जाची छाननी
  • १२ एप्रिल : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक
  • २९ एप्रिल : मतदान
  • २३ मे : मतमोजणी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -