‘वाळूचा एक कणही उचलू देणार नाही’; देवळा तालुक्यातील ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे ठेका रद्द करण्याची नामुष्की

नाशिक : नागरिकांना स्वस्तात वाळू उपलब्ध करून देत गौण खनिज विभागातील गैरकारभार रोखून पारदर्शकता आणण्यासाठी नवीन वाळू धोरण आखण्यात आले खरे; मात्र नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील भऊर, विठेवाडी, सावकी, खामखेडा, लोहोणेर आणि बागलाण तालुक्यातील नामपूर ग्रामस्थांनी या विरोधात दंड थोपटले आहे. एकही वाळूचा कण उचलू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने निविदा प्रक्रियेत गेलेले ठेके रद्द करण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय देवळा व बागलाण तहसील कार्यालयाने घेतला आहे.

हा प्रस्ताव जिल्हा गौण खनिज विभागाला प्राप्त झाल्यानंतर गौण खनिज अधिकारी या जिल्हाधिकाजयांमार्फत तसा प्रस्ताव शासनाला सादर करण्याची शक्यता आहे. शासनाच्या वाळू घाटाच्या लिलाव धोरणास देवळा तालुक्यातील भऊर, विठेवाडी, सावकी, खामखेडा, लोहोणेर आदी गावांतील शेतकर्‍यांनी प्रखर विरोध करीत गावातील वाळूचा कणही बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

बागलाण तालुक्यातील नामपूर येथील ग्रामस्थांनीही वाळु उत्खननाला विरोध दर्शवला आहे.देवळा तालुक्यातील चार वाळू घाटांचा ठेका वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना विठेवाडी येथील टी. एस. देवरे यांना ३७३ रुपये टन दराने देण्यात आला आहे. तर दुसरा ठेका बागलाण तालुक्यातील नामपुर येथील तुळजाई ट्रेडर्सला ३५४ रुपये टन दराने देण्यात आला आहे. मौसम आणि गिरणा नदीपात्रातून ही वाळू काढली जाणार आहे. पण स्थानिक ग्रामस्थांचा विरोध पहाता हे दोन्ही ठिकाणचे ठेके रद्द् होण्याची शक्यता आहे.दरम्यान मालेगाव तालुक्यातील दाभाडी, नरडाणे येथील पाच घाटांसह कळवण तालुक्यातील ककाने, नाकोडे व बागलाण तालुक्यातील धांगरी येथील ठेक्यासाठी निविदा प्राप्त न झाल्याने निविदा प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.