घरक्राइमतक्रारदारावरच आक्षेप, बदलीच्या ठिकाणी करतात आरोप

तक्रारदारावरच आक्षेप, बदलीच्या ठिकाणी करतात आरोप

Subscribe

आज पोलीस घेणार तक्रारदार गजेंद्र पाटलांचा जबाब

राज्यभरात खळबळ उडवून दिलेल्या परिवहन विभागातील कोट्यवधींच्या भ्रष्टाचारप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागात कार्यरत असलेले तक्रारदार तथा मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील केेंद्रस्थानी आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांवर केलेल्या आरोपींमुळे पाटील यांच्याबद्दल परिवहन विभागात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. बदलीच्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत वादाचे प्रसंग निर्माण झाले. जो अधिकारी त्यांचे ऐकत नाही, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याची त्यांची कार्यपद्धती असल्याचे, आरटीओतील एका अधिकार्‍याने सांगितले. दरम्यान, सोमवारी (दि.३१) निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांची पोलीस चौकशी करणार आहेत.

प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचार आरोपांप्रकरणी शहर पोलिसांनी तपास वेगाने सुरु केला आहे. चौकशी अधिकारी पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी शनिवारी (दि.२९) परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांची संध्याकाळपर्यंत चौकशी करत जबाब नोंदवून घेतला. ढाकणे यांच्या कार्यालयाकडून झालेल्या पत्रव्यवहार व आदेशांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोमवारपर्यंत संबंधित कागदपत्रे गुन्हे शाखेकडे जमा केले जाणार आहेत. त्यानंतर सर्वांची चौकशी आणि पुरावे संकलित केल्यानंतर पोलीस पुढील निर्णय घेणार आहेत. गजेंद्र पाटील यांनी जळगावी असताना तत्कालीन वरिष्ठ अधिकार्‍यांवर लैंगिक आरोप केले होते. धुळ्यातील अधिकार्‍याशी त्यांचा चांगला संवाद होता. तरीही, त्यांच्यावर त्यांनी लाचखोरीचा आरोप केला. विशिष्ट प्रकारची ड्युटी मिळाली नाही की ते स्थानिक अधिकार्‍यांवर आक्षेप घेतात, असेही एका अधिकार्‍याने ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

- Advertisement -

परब, खरमाटेंच्या हातातील बाहुले

अनिल परब यांनी परिवहन विभागाचा कारभार पाहण्यासह पैसे गोळा करण्यासाठी वर्धा येथील डेप्युटी आरटीओ बजरंग खरमाटे यांची नेमणूक केली. खरमाटे दोनवेळा निलंबित झालेले आहेत. अधिकार्‍यांच्या तक्रारी करणे आणि अँटी करप्शनकडून त्या मिटवून घेण्याचे उद्योग खरमाटे करतात. बदल्यांमधील निम्मे पैसे त्यांनी स्वतःकडे ठेवले, निम्मे परब यांच्याकडे पोहोचवले. शरण न जाणार्‍या अधिकार्‍यांच्या बदल्या करणे, कारवाई करण्याचे प्रकार ते करतात. हप्ते वसूलीसाठी विभागीय स्तरावर अधिकार्‍यांची नियुक्ती केलेली आहे. परब स्वतः खरमाटे यांच्या हातातील बाहुले झाले आहेत. कळसकर यांना धुळे आणि नाशिकमधून महिन्याकाठी ८५ लाख रुपये, खरमाटे यांना नागपूरमधून २ कोटी, अतुल आदे यांची पिंपरी चिंचवडमधून ५० लाख रुपये कमाई असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

कोण आहेत तक्रारदार?

सध्या नाशिक ’आरटीओ’त मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले तक्रारदार गजेंद्र पाटील धुळे येथे कार्यरत असताना त्यांनी तत्कालीन आरटीओ तडवी यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून त्या तडवींना लाच घेताना अटक झाली होती. त्यानंतर काही दिवसांतच पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. पाटील सध्या नाशिक ’आरटीओ’त मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असले, तरी त्यांनी निलंबनाच्या कारवाईनंतरच तक्रार का केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -