उत्तुंग कार्य करणारा शिवविचारांचा ‘सागर’

युनाईटेड वुई स्टँड संस्थेच्या माध्यमातून शेकडो युवकांची साखळी

तरुण पिढी भरकटलीय.. तिला दिशा देण्याची गरज आहे.. पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाने तरुणांना व्यभिचारी केलंय.. अशी वाक्य सतत कानावर पडत असतात आणि त्यातूनच तरुणाईच्या भविष्याची चिंता भेडसावू लागते. अशा अनिश्चिततेच्या काळात एक तरुण निःस्वार्थीपणे, जराही प्रकाशात न येता, सामाजिक कार्याचा ध्यास घेत आभाळाएवढं काम उभं करतो आणि सोबत आपल्यासारख्या सामाजिक जाणीवा असलेल्या तरुणाईची अजोड साखळी तयार करतो. त्याच्या कार्याची दखल थेट पंतप्रधान मोदी, दिवंगत सैन्य प्रमुख बिपीन रावत अशा अनेक दिग्गजांनी घेतलीय. या तरुणाचं नाव सागर मनोहर मटाले. सागरच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या अथांग कार्याचा मोजक्या शब्दांत घेतलेला मागोवा..

वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेत चांगला समाज घडवण्याच्या प्रेरणेने सागरच्या कार्याची सुरुवात झाली. मोठमोठ्या संस्थांना जमणार नाही अशापद्धतीचं आभाळाएवढं कार्य त्याने उभं केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पना आणि जीवनातील मूल्यांपासून प्रेरणा घेत ’युनायटेड वुई स्टँड’ या संस्थेची सुरुवात केली. कुठलाही अधिकृत पदाधिकारी नसलेल्या या संस्थेच्या सक्रिय स्वयंसेवकांची संख्या आज ८०० हून अधिक आहे. या संस्थेच्या माध्यमातून देशप्रेम, भारतीय संस्कृती, भारतीय सैन्यदल, शिवाजी महाराजांचे विचार यावर आधारित समाज घडवण्यासाठी काम उभे करण्याचे कार्य गेल्या ९ वर्षांपासून सुरू आहे.

या संस्थेच्या कामाची पावती म्हणजे देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि दिवंगत सैन्यप्रमुखांनी स्वतःहून सागर आणि त्याच्या सहकार्यांना भेटण्यासाठी खास निमंत्रण देत बोलावून घेतले. कौतुकाने पाठीवर थाप देत यापुढेही असेच काम करत राहण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. एवढे उत्तुंग काम करूनही कोणताही वैयक्तीक किंवा राजकीय महत्वाकांक्षा न ठेवता सागर वाटचाल करतोय. सागरने आजवर अनेक धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, देशभक्तीपर संकल्पना राबवल्या आहेत. त्याने उभ्या केलेल्या या कार्याचा मुद्देनिहाय आढावा..

  • शिवाजी महाराजांचा केवळ जयजयकार न करता त्यांच्या मूल्यांवर आधारित जीवन जगणे काय असते हेच सागरच्या प्रवासातून बघायला मिळते. कार्यात, ध्येयात प्रामाणिकपणा असेल तर आपोआपच आपल्यासोबत लोकही जोडले जातात आणि थोरामोठ्यांचं पाठबळ मिळत. याच विचारधारेमुळे सागरसोबत आज ८००हून अधिक तरुण-तरुणी सक्रिय काम करत आहेत. तर, हजारो नागरिकांचा त्याच्या कार्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असतो. देशभरातील मोठे उच्चपदस्थ अधिकारी, राजकारणी अगदी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, सैन्यप्रमुख आदींचा त्याला आशीर्वाद नेहमी मिळत असतो.
  • युनाईटेड वुई स्टँड संस्थेच्या माध्यमातून सागरने शेकडो तरुणांच्या समाजसेवा, देशसेवा करण्यासाठी प्रेरित करत एकत्र आणले आहे. आजच्या काळात तरुणांच्या उर्जेला अशापद्धतीची दिशा मिळणे हेच मुळात एकप्रकारे आदर्शवत आहे. त्याच्या कामातील प्रामाणिकपणामुळे दिवसागणिक त्याच्या संपर्कसाखळीत वाढच होत चाललीय. त्याच्याशी एकदा मैत्री झालेला व्यक्ती कायमचा त्याचाच होऊन जातो.
  • राष्ट्रभक्ती आणि भारतीय संस्कृती यावर निस्सिम प्रेम असणारा हा तरुण त्याअनुषंगाने आपल्या सवंगड्यांच्या माध्यमातून अनेक कामं करत असतो. त्यात भारतीय सैन्य कसे काम करते हे सामान्य नागरिकांना, शाळकरी मुलांना समजावे, विद्यार्थ्यांनी त्यातून प्रेरित व्हावे यासाठी त्याने know your army अर्थात आपल्या सैन्याला जाणून घेऊ ही संकल्पना राबवली. देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनी शहरातील सिटी सेंटर मॉलमध्ये भरलेले शस्त्रास्त्र प्रदर्शन हा त्याचाच एक भाग होता.
  • समाजातील आदिवासी, शोषित, वंचित घटकांसाठी सहानभूती असलेला सागर त्यांच्या उन्नतीसाठी सतत धडपडत असतो. समाजातील हा घटक पुढे यावा, यासाठी त्यांच्यापर्यंत सुलभ पद्धतीने शिक्षण सुविधा पोहोचल्या पाहिजेत या हेतूने त्यांच्या शैक्षणिक साहित्य, निवारा, पाणी, जीवनावश्यक वस्तु अशा मूलभूत गरजांचीदेखील पूर्तता केली जातेय. सोलारद्वारे विजेची सुविधासुद्धा त्याने उभारली. आदिवासी भागातील महिला स्वावलंबी व्हाव्यात यासाठी त्यांना विविध प्रकारच्या कार्यशाळांच्या माध्यमातून प्रशिक्षितही करण्यात आले आहे.