हट्टी येथे घराची भिंत कोसळून वृद्धा ठार

पावसाचा अंदाज नसल्याने वृद्ध महिलेने झोपण्यासाठी घेतला होता भिंतीचा आडोसा

बुबळी : सुरगाणा तालुक्यातील हट्टी येथे घराची भिंत कोसळून वृद्ध महिला ठार झाली. तालुक्यात बेमोसमी पावसाने सर्वांची धांदल उडवली आहे. त्यातच मंगळवार (दि. १२) रोजी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मृत वृद्धेच्या घर पूर्णपणे ओले झाले होते. परंतु त्यांना या पावसाचा अंदाज नसल्याने ती वृद्धा रात्री भिंतीचा आडोसा घेत झोपली होती. दुर्दैवाने ती भिंत पाच वाजेच्या सुमारास अंगावर कोसळल्याने तिचा मृत्यू झाला.

सकाळी तिच्या मुलांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी मृतदेह तात्काळ बाहेर काढून पोलीस पाटील मधुकर चौधरी यांना माहिती देत त्यांनी सुरगाणा पोलीस ठाणे येथे माहिती दिली. त्यानंतर सुरगाणा पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहारे, डंबाळे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.