होळीच्या दिवशी, भररस्त्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराला सपासप वार करून संपवले

पंचवटी : टोळक्याने भरस्त्यात तरुणाचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.६) सायंकाळी 6.30 वाजेदरम्यान दिंडोरी रोडवरील अभिषेक स्वीट्ससमोर घडली. मृत तरुण रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. २०१८ मध्ये मृत तरुणाच्या मोठ्या भावाचादेखील खून झाला होता. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. करण सुकलाल गुंजाळ (वय २६, रा. शनी मंदिर, पेठ रोड, पंचवटी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण गुंजाळ हा कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यवसाय करत होता. सोमवारी सायंकाळी 6.30 वाजेदरम्यान ४ जणांच्या टोळक्याने किरणवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांच्या मागावर पोलिसांनी जवळपास निमाणीच्या दिशेने ५ किलोमीटर पाठलाग केला. संशिय आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासणी सुरू केली आहे.

किरण गुंजाळचा खून झाल्याचे समजताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉ. किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे, रणजित नलावडे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, आनंद वाघ यांच्यासह रक्ताचे नमुने आणि इतर तपासासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. मारेकर्‍यांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आहेत. पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत.