नाशिक : अधिक महिना संपण्यास दोन दिवस शिल्लक राहिल्याने या अधिकमासाचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी गोदाघाटावर मोठी गर्दी होत आहे. रामकुंड परिसरातील या गर्दीमुळे सोमवारी (दि.१४) दिवसभर मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा भागात वाहतूक कोंडी कायम होती.
रामकुंडासह गोदाघाट परिसर इतर भागांच्या तुलनेत अरुंद असून, या परिसरात रिक्षा, दुचाकींची पार्किंग आणि रस्त्यावरील व्यावसायिकांच्या अतिक्रमणांमुळे येथे दिवसभर वाहतूक कोंडी असते. त्यातच अधिकमासानिमित्त येणार्या भाविकांच्या गर्दीने रामकुंडासह पंंचवटीतील विविध मंदिरे गर्दीने फुलून गेली आहेत. दररोज सकाळच्या सुमारास विविध कर्मकांड आणि दशक्रियेसह अन्य विधीसाठी गर्दी असते. परंतु, सध्या अधिकमासामुळे या गर्दीत दुप्पट वाढ झालेली बघायला मिळते. गोदाघाटावर देवी-देवतांची संख्या अधिक असल्याने प्रत्येक ठिकाणी वाण विकत घेणे महिलांना शक्य होत नसते. यामुळे देवांना लावण्यासाठीचे वाणांची महिला घरूनच तयारी करून आणतात.
पर्यटन व्यवसायाला चालना
गेल्या आठवडाभरापासून गोदाघाटावर येणार्या भाविकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेले पूजा साहित्य विक्रेते, खेळणे विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, रिक्षावाले यांसह लहान-मोठ्या व्यावसायिकांची उलाढाल वाढली आहे. यामुळे पंंचवटीतील पर्यटन व्यवसायाला चालना मिळाल्याचे चित्र आहे.
वस्त्रांतरगृहाचा काही लोकांनी घेतला ताबा
रामकुंड येथे बनविण्यात आलेले वस्त्रांतरगृह काही विशिष्ट लोकांच्या ताब्यात आहे. त्यामुळे अधिकमासानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्नानासाठी आलेल्या महिला भाविकांना स्नान झाल्यावर उघड्यावरच आडोसा तयार करून कपडे बदलावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही याठिकाणी निर्माण झाला आहे.
एकेरी मार्ग बनले दुहेरी
मालेगाव स्टँडकडून रामकुंडावर जाणारा रस्ता हा एकेरी मार्ग आहे. तसा फलकही रामकुंडावर लावण्यात आला आहे. परंतु, तरीही दुचाकी, चारचाकी वाहने बिनदिक्कत नियम धाब्यावर बसवून एकेरी मार्गाने येतात. विशेष म्हणजे रामकुंड परिसरात एकही वाहतूक शाखेचा कर्मचारी उपस्थित राहत नसून, मालेगाव स्टँडवरील सिग्नलला उभे राहून नियम मोडणार्या केवळ बाहेरगावच्या चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करतात. त्यामुळे आलेल्या भाविकांमध्ये गैरसमज पसरत आहे.