Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र अखेरच्या श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर शिवभक्तांनी गजबजले; शहरातील शिवमंदिरांमध्येही गर्दी

अखेरच्या श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर शिवभक्तांनी गजबजले; शहरातील शिवमंदिरांमध्येही गर्दी

Subscribe

नाशिक : श्रावणातील अखेरचा सोमवार असल्याने त्र्यंबकेश्वर भाविकांच्या गर्दीने फुलुुन गेले होते. रविवारच्या सुट्टीच्या निमित्ताने देशभरातून भाविक भक्त त्र्यंबक नगरीत दाखल झाल्याने गर्दीत अधिकच भर पडली. सोमवारी सकाळपासून मंदिर खुले करण्यात आल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. शेवटचा सोमवार असल्याने अनेक भाविकांची ब्रह्मगिरी फेरीची पर्वणी साधली.

श्रावण सोमवार म्हटला की नाशिक शहरातील अनेक महादेव मंदिरात गर्दी पाहायला मिळते. त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर दर्शनासाठी मोठी गर्दी होते. मागील तिसर्‍या सोमवारी तर गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. त्यानंतर चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने रविवारी सायंकाळपासूनच भाविकांच्या गर्दीने त्र्यंबक नगरी गजबजून गेली आहे. पहाटे चार वाजेला मंदिर खुले करण्यात आल्यानंतर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा मंदिर परिसरात होत्या. तर कुशावर्त तीर्थावरही स्नानासाठी गर्दी झाली होती. नाशिकहून दरवर्षी येणारी रामवारी दिंडी सायंकाळी हरिहर भेटीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल त्यामुळे गर्दीत आणखीनच भर पडली. ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी भाविकांचा प्रचंड सहभाग पाहायला मिळाला.

नाशिक ते त्र्यंबक हरिहर भेट दिंडी

- Advertisement -

नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण पूर्णपणे भरले आहे. त्र्यंबकला होणार्‍या पावसामुळे धरण भरते, ही जाणीव ठेवत नाशिकची दिंडी त्र्यंबकराजा व संत निवृत्तीनाथांचे आभार मानण्यासाठी अजा एकादशीला येत असते. या दिंडीला हरिहर भेटही म्हणतात. वेदांत वाचस्पती वै. जगन्नाथ महाराज पवार यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेली ही दिंडी आजही सुरू असून श्रीराम वारकरी मंडळ तो वारसा चालवत आहेत. संत निवृत्तीनाथ संस्थानकडून या दिंडीचे स्वागत करण्यात आले. वारकरी मंडळातर्फे श्रावण महिन्यातील वद्य एकादशीनिमित्ताने सकाळी श्री काळाराम मंदिर ते त्र्यंबकेश्वर संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरपर्यंत हरिहर भेट पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजता श्री काळाराम मंदिर येथे प्रभू रामाचे दर्शन घेऊन रामाच्या पादुका वरील तुळस घेऊन वारकरी त्र्यंबकेश्वरकडे टाळ मृदुंग वाजवत भजन, कीर्तन, भारुड म्हणत राम मंदिरामार्गे हरिहर भेट निमित्त पायी दिंडी त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाली होती.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -