रेशनकार्ड मिळूनही दीड लाख कुटुंब धान्यापासून वंचित

डाटा एन्ट्रीचे काम बंद असल्याने लाभ मिळण्यात अडचणी

नाशिक : कोरोनाकाळात पुरवठा विभागाकडून नागरिकांना स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य उपलब्ध करून देण्यात आल्याने मोठा आधार मिळाला. आजही सर्वसामान्यांना रेशन दुकानांमधून मिळणार्‍या धान्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. परंतू रेशनकार्ड मिळूनही आजही दीड लाख कुटुंबातील सहा ते सात लाख नागरिक रेशनच्या धान्यापासून वंचित आहेत. या नागरिकांना रेशनकार्ड देण्यात आले. परंतू, डाटा एन्ट्री न केल्याने या शिधापत्रिकाधाकांना धान्याचा लाभ मिळू शकत नाही. यासंदर्भात शिवसेनेचे ॠषीकेश वर्मा यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना निवेदन दिले.

गेल्या काही वर्षांपासून कोरोनाच्या बिकट परिस्थितीमुळे शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक रेशनकार्डधारक तसेच सरकारमान्य दुकानदारांची परिस्थिती बिकट झालेली आहे. धान्यवितरण कार्यालयात साधारण कोरोनाकाळात म्हणजेच दोन वर्षांपासून डाटा एन्ट्री (आधार कार्ड लिंक) ची कामे थंड आहेत.त्यामुळेच सुमारे दीड लाख नवीन रेशनकार्डधारक धान्यापासून पुर्णपणे वंचित असुन कोरोना विषाणूंची लागण होऊन सुमारे दोन वर्षांत अनेक नागरिकांचा मृत्युही झाला तरीही त्याच्या कुटुंबीयाना आजतागायत आधारकार्ड लिंक नसल्यामुळेच रेशन धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. या नागरिकांची डाटाएन्ट्री करून त्यांना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी शिवसेना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या वतीने ऋषिकेश वर्मा यांनी केली आहे. आठ दिवसांत निर्णय न झाल्यास शिवसेना पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.