कसारा घाटात ट्रकच्या अपघातात एक ठार, तीन प्रवाशी गंभीर जखमी

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटात ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ट्रक दुभाजकाला आदळून उलटल्याने झालेल्या अपघातात काकाचा जागीच मृत्यू, तर पुतण्यासह तीन जण गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग सुरक्षा पोलीस व कसारा पोलीस कर्मचारी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना कसारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना कसारा बायपास साईबाबा खिंडीजवळ नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला. ट्रक उलटल्याने त्याखाली दोन व्यक्ती दाबले गेले. या अपघाताची माहिती समजताच कसारा पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी कसारा येथील आपत्ती टीमचे प्रमुख श्याम धुमाळ यांना मदतीची विनंती केली. पथकाने तीन तास अथक प्रयत्न करत जखमींची सुटका केली. ट्रकचालक आनंद त्रिभुवन जागीच ठार झाले होते, तर अमोल गायकवाड, संतोष शेलार, अण्णासाहेब त्रिभुवन हे गंभीर जखमी झाले. आनंद व पुतण्या अण्णासाहेब सोबत जात होते.