घरमहाराष्ट्रनाशिकवर्ष झाले तरी मिळेना कांद्याचे पैसे!

वर्ष झाले तरी मिळेना कांद्याचे पैसे!

Subscribe

येवला बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजारातील धक्कादायक प्रकार

कांद्याला भाव नसल्यामुळे आधीच शेतकरी संकटात आहे. त्यातच तब्बल वर्षभर कांदा विक्रीची रक्कम मिळाली नसल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. येवला बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजारात तब्बल वर्षभरापासून अनेक शेतकर्‍यांचे लाखो रुपये व्यापार्‍यांकडे अडकले आहेत. कांदा उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडून गेले असताना बाजार समितीकडून मात्र शेतकर्‍यांना रोख पेमेंट देत असल्याचा दावा केला जात असल्याने शेतमाल बाजार यंत्रणेतील सावळागोंधळच समोर आला आहे.

येवला तालुक्यातील गवंडगाव येथील तुकाराम भागवत या कांदा उत्पादकाने २० फेब्रुवारी २०१८ ला येवला बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात सव्वाशे क्विंटल कांदा विकला. त्यानंतर बाजारातील आडतपेढीवर वेळोवेळी चकरा मारुनही त्यांना पैसे मिळाले नाहीत. घरचे लग्न असताना भागवत यांना पैसे मिळाले नाहीत. शेवटी नाईलाजाने त्यांना बाजार समितीसमोर उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला. तेव्हा माल विक्रीच्या सुमारे १० महिन्यांनी दिवाळीच्या काळात त्यांच्या दीड लाख रकमेपैकी ४० हजार रुपये बाजार समितीने संबंधित व्यापार्‍यांकडून काढून दिले. त्यांची अजून ७० टक्के रक्कम बाकीच आहे. त्यानंतर तो हैद्राबाद येथील व्यापारीही गायब आहे. शंकर दत्तात्रय पैठणकर या आडत कंपनीमध्ये हा माल विकला होता. ती कंपनीही बंद करण्यात आली आहे. या परिस्थितीत भागवत यांना आपल्या कष्टाने पिकविलेल्या कांद्याचे मोल वर्षानंतरही मिळेल की नाही. याबाबत साशंकताच आहे तुकाराम भागवत हे प्रातिनिधीक उदाहरण आहे. येवला तालुक्यातील दोनशेहून अधिक शेतकर्‍यांचे लाखो रुपये व्यापार्‍याकडे वर्षभरापासून अडकून पडले असल्याचे येवला भागातील शेतकर्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

शेतकर्‍याच्या नशीबी हेलपाटेच

येवला तालुक्यातील अंदरसूल भागातील दोनशेहून अधिक कांदा उत्पादकांचे लाखो रुपये अंदरसूल उपबाजारात व्यापार करणार्‍या परप्रांतीय व्यापार्‍याकडे अडकून पडले आहेत. भागवत यांच्यासह इतरही शेतकर्‍यांनी फेब्रुवारी महिन्यापासून अंदरसूल उपबाजार व येवला बाजार समितीत अनेकदा चकरा मारल्या. बाजार समितीतून प्रत्येक वेळी पैसे मिळवून देण्याचे आश्वासन देऊन शेतकर्‍यांची बोळवण करण्यात आली.

आम्ही तर रोख पेमेंट करतो!

येवला बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे म्हणाले की, आमच्या बाजार समितीत एप्रिल २०१८ पासून रोख पेमेंट केले जात आहे. कुणाही शेतकर्‍यांची अडवणूक होत नाही. त्यापुर्वी काही शेतकर्‍यांचे थोडे फार पैसे अडकले असतील. त्यांना व्यापार्‍यांकडून मिळवून देऊ. कुणाही शेतकर्‍यांवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही.

- Advertisement -

पैसे देण्यासाठी प्रयत्नशील

अंदरसूल उपबाजारातील आडतदार रामेश्वर पैठणकर म्हणाले की, मोहम्मद शेख या हैद्राबाद येथील व्यापार्‍याने काही शेतकर्‍यांचे अडकवून ठेवले आहेत. त्याबाबत आम्ही त्याच्याशी संपर्कात आहोत. त्या व्यापार्‍याची मालमत्ता विकून तो शेतकर्‍यांचे पैसे थोडे थोडे देणार आहे. आम्ही आमची आडत कंपनी आता बंद केली आहे. मात्र तरीही शेतकर्‍यांचे पैसे देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

हाती काहीही लागले नाही

माझ्या एकत्रित कुटुंबाकडून ८ एकर उन्हाळ अन ८ एकर लाल, असे १६ एकरावर कांदापीक घेतो. मागच्या फेब्रुवारी महिन्यात विकलेल्या कांद्याचे पैसे अजून मिळालेले नाही. येवला बाजार समितीत वर्षभर हेलपाटे मारले. उपोषणही केले. मात्र हाती काहीही लागले नाही. – तुकाराम भागवत, कांदा उत्पादक, गवंडगाव.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -