अवघे १२ दिवस शिल्लक, तरीही उद्घाटकाचा पत्ता नाही

देशभरातून साहित्य संंमेलनास येणार्‍या साहित्यिक, लेखक, कवींना कार्यक्रमपत्रिका कधी व कशी मिळेल, रसिकांना पडला प्रश्न

Akhil-Bharatiya-Marathi-Sahitya-Sammelan

नाशिक : कविवर्य कुसुमाग्रज नगरीत होणार्‍या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक अद्यापही निश्चित झाले नसून, कार्यक्रमपत्रिकेत वारंवार बदल केला जात आहे. परिणामी, देशभरातून साहित्य संंमेलनास येणार्‍या साहित्यिक, लेखक, कवींना कार्यक्रमपत्रिका कधी व कशी मिळेल, असा प्रश्न रसिकांना पडला आहे. शिवाय, आयोजकांनी कार्यक्रमपत्रिकेत बदल करत साहित्य संंमेलनाच्या दुसर्‍या दिवशी ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता मुख्य मंडपामध्ये साहित्यिक शफाअत खान यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित केला आहे. या परिसंवादात एक वक्ता या नात्याने खासदार डॉ. अमोल कोल्हेही सहभागी होणार आहेत.

कविवर्य कुसुमाग्रज नगरी, मेट भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस, आडगाव येथे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3 ते 5 डिसेंबर या तारखांना होत आहे. संमेलनाच्या सांगता सत्रात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आले असून, त्यांनी ते स्वीकारले आहे. त्यामुळे ते समारोप कार्यक्रमास उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आयोजकांनी कार्यक्रमपत्रिकेत पुन्हा बदल आहे. संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता मराठी नाटक- एक पाऊल पुढे, दोन पावले मागे या विषयावर मुख्य मंडपामध्ये परिसंवाद आयोजित केला आहे.

या परिसंवादात अभिनेते तथा राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे दुसर्‍या दिवसाच्या परिसंवादात सहभागी होणार आहेत. शिवाय, निर्माता-दिग्दर्शक तथा अभिनेता सुबोध भावे, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये, प्राजक्त देशमुख, पराग घोंगे, डॉ. सतीश साळुंके हे वक्ते सहभागी होणार आहेत. संमेलनास खासदार श्रीनिवास पाटील हेदेखील संमेलनात उपस्थित राहणार आहेत. संमेलनास अवघे १२ दिवस शिल्लक राहिले असून, कार्यक्रमपत्रिकेची देशभरातील साहित्यिक, लेखक, कवींसह रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, कार्यक्रमपत्रिका मिळाली असल्याने ती कधी मिळणार आहे, असा प्रश्न रसिकांना पडला आहे.

माजी न्यायमूर्ती संमेलनात राहणार उपस्थित

साहित्य संमेलनाचे कार्यवाह प्रा. शंकर बोर्‍हाडे आणि संजय करंजकर यांनी औरंगाबाद दौर्‍यात माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची भेट घेतली. यावेळी आयोजकांनी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभाचे निमंत्रण माजी न्यायमूर्ती चपळगावकर यांना दिले. यावेळी समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे उपस्थित होते. माजी न्यायमूर्ती चपळगावकर यांनी संमेलनाचे निमंत्रण स्वीकारले असून, ते संमेलनासाठी पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. भेटीप्रसंगी माजी न्यायमूर्ती चपळगावकरांनी नाशिकमधील आठवणींना उजाळा दिला.

स्वागत समिती सदस्यांसाठी निळे जॅकेट

साहित्य संमेलन नियोजनबद्धरित्या पार पडण्यासाठी ४० समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये स्वागत समितीचाही समावेश आहे. या समिती प्रमुख व सदस्यांनी सर्वानुमते संमेलनाच्या तीन दिवस निळ्या रंगाचे जॅकेट परिधान करण्याचे निश्चित केले आहे. समितीमध्ये २४ सदस्य आहेत. सर्वांनी स्वखर्चाने कोट खरेदी केला आहे. त्यामुळे या समितीचे संमेलनस्थळी वेगळेपण दिसून येणार आहे.

पुस्तक यात्रा रसिकांच्या भेटीला; २०० स्टॉल्स आरक्षित

साहित्य संमेलनास हजेरी लावणार्‍या साहित्यिक, लेखक, कवी, रसिकांसाठी पुस्तक यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ग्रंप्रदर्शनाचे नियोजित २०० स्टॉल्स पूर्ण आरक्षित झाले आहेत. सातत्याने राज्याच्या कानाकोपर्‍यातून विचारणा होत असल्याने अधिक स्टॉल्स देण्याच्या दृष्टीने विचार केला जात आहे. स्वागत समितीचे सभासद होण्यासाठीही नाशिककर पुढे येत आहेत. तसेच प्रतिनिधींची संख्याही वाढत असून, बाल कुमार मेळावा, कविकट्टामध्ये सहभाग घेण्यासाठी विचारणा होत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.