घरमहाराष्ट्रनाशिकवटवृक्ष घ्या दत्तक, नाशिक मनपा देईल घरपोच सेवा

वटवृक्ष घ्या दत्तक, नाशिक मनपा देईल घरपोच सेवा

Subscribe

वटवृक्षांची संख्या वाढवण्यासाठी महापालिकेचा पुढाकार, वटवृक्ष दत्तक देण्याची संकल्पना

पंचवटी अर्थात पाच वटवृक्षांसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये आज अवघे २,३८० वड शिल्लक आहेत. मुबलक प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करणार्‍या या वृक्षांची संख्या शहरात पुन्हा एकदा वाढवण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वटवृक्ष दत्तक देण्याची संकल्पना पुढे आली आहे. या अंतर्गत ज्या नागरिकांना वड लावण्याची इच्छा असेल, त्यांना महापालिकेच्या वतीने रोप वाटप करण्यात येतील. तसेच रोपणासाठी खड्डे खोदून देण्यात येतील. शिवाय रोपांना संरक्षक जाळ्याही लावण्यात येतील. या रोपाचे संवर्धन करण्याची जबाबदारी दत्तक पित्याची अर्थात नागरिकांची असेल.

पंचवटी अर्थात पाच वडांच्या स्थळासाठी नाशिकची जगभर ओळख आहे. जुन्या-जाणत्या नाशिककरांच्या मते शहरात हजारो वडाची झाडे होती. भारतीय संस्कृतीत आणि आयुर्वेदातही वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शुद्ध प्राणवायू देण्याचे महत्कार्य हा वृक्ष करीत असतो. अशा या दुर्मिळ आणि बहुगुणी असलेल्या वटवृक्षांची संख्या दिवसेंदिवस कमीच होत आहे. अनेक ठिकाणी वटवृक्षांमुळे दुकाने झाकली जातात. अशा ठिकाणी काही व्यावसायिक वृक्षाच्या मुळाशी कचरा जाळतात. काही व्यावसायिक झाडाचे साल काढतात. शिवाय मुळाशी डांबरही टाकले जाते. त्यामुळे हा विशालकाय वृक्ष कोलमोडून पडतो किंवा ते विनापरवानगी तोडलेही जातात. शहरात दहा वर्षात प्रकारे सुमारे अडीच हजार वृटवृक्ष कमी झाले आहेत. ही ‘पडझड’ अशीच सुरू राहिल्यास प्रदुषणाची मोठीच समस्या निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता वडाचे रोप दत्तक देण्याची योजना हाती घेतली आहे. त्यात रोप देण्यापासून संरक्षक जाळी लावण्यापर्यंतची जबाबदारी महापालिका घेईल. मात्र, या रोपाचे विशाल वृक्षात रुपांतर करण्यासाठी दत्तक पित्याला प्रयत्न करावे लागणार आहे. झाडाला रोजच्या रोज पाणी घालणे, त्याला गुरांपासून वाचवणे, वेळच्यावेळी खत घालणे हे काम संबंधितांना करावे लागणार आहे. अर्थात हे रोप भविष्यात तोडले जाणार नाही, अशाच ठिकाणी लावण्यास परवानगी देण्यात येईल.

- Advertisement -

असे हे बहुपयोग

  • एक पूर्ण वाढलेले वडाचे झाड एका तासाला सातशेबारा किलो प्राणवायू सोडते.
  • वडाची मुळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो.
  • आकाराने मोठी व संख्येने भरपूर पाने असल्यामुळे तो जास्तीत जास्त कर्बवायू आणि इतरही अनेक विषारी वायू शोषून घेतो व हवा शुद्ध ठेवतो
  • वड उन्हाळ्यात दिवसाला दोन टन इतके पाणी बाष्प स्वरुपात बाहेर फेकतो
  • वडाचा उपयोग ढग बनण्यासाठी आणि हवेत आर्द्रता व गारवा निर्माण करण्यासाठी देखील होतो.
  • वटवृक्ष सदैव हिरवागार असतो व त्याच्या विशाल आकारामुळे तो भरपूर सावली देतो.

शहरातील वृक्षांची सद्यस्थिती

  • ४८ लाख वृक्ष शहरात
  • ५ हजार वृटवृक्ष दहा वर्षापूर्वी
  • २३८० वटवृक्ष शिल्लक

दरवर्षी १०० वटवृक्ष जगवणार

सिमेंटच्या वाढत्या जंगलामुळे दिवसेंदिवस दुर्मिळ अशा वटवृक्षांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात वडाच्या झाडांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात दरवर्षी किमान शंभर वटवृक्ष जगवली जाणार आहेत. रोपांसाठी नागरिकांनी ९५७९५७५४०४ या क्रमांकावर संपर्क साधावा. – महेश तिवारी, उद्यान अधीक्षक, महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -