कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात संचारबंदीच्या काळात भाजीबाजार, अधिकृत मटन, चिकन व अंडी विक्रीची दुकाने सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू राहतील अशा प्रकारचे आदेश नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांनी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत अत्यावश्यक वस्तुंची विक्री करणाऱ्या आस्थापना सुरू राहतील. यातून वैद्यकीय सेवा वगळण्यात आल्या असून दुग्ध पुरवठा सेवासाठी शिथिलता देण्यात आली आहे, असे आदेश निर्गमित केले आहेत.
नाशिक जिल्ह्यात लॉकडाउनच्या पार्श्वभुमीवर अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवाप्रसंगी २४ तास चालू ठेवण्याबाबतही निर्णय घेण्यात आला होता, असा निर्णय ज्यावेळी घेण्यात आला त्यावेळी शहरात व जिल्ह्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. त्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या पाठोपाठ शहरातही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे व नाशिक शहर पोलीस आयुक्त अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवांची दुकाने व आस्थापना यांच्या वेळा निर्धारित करण्याचा निर्णय घेतला आहे. काही रूग्णांना कोरोना चा झालेला संसर्ग व त्यापासून कोरोनाचे होणारे सामुहिक, सामाजिक संक्रमण रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सी पाळण्याचे आदेश वेळोवेळी प्रशासनाने दिले होते. मात्र, काहीजण त्याचे पालन करण्याऐवजी जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीच्या नावाखाली मॉर्निंग वॉक, सायंकाळी फिरणे व समुहाने जमू लागल्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव व सामुहिक संक्रमणाचा धोका अधिक वाढला असल्याचे जाणवले.
सर्वसाधारणपणे सर्व जिल्ह्यासाठी लागू असणारे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित होतात. मनपा क्षेत्रापुरते विशेषतः जे विषय मनपा हाताळते त्या विषयासंदर्भात आदेश मनपाकडून निर्गमित होतात व शहरातील कायदा-सुव्यवस्था अथवा कलम 144 या प्रभावी अंमलबजावणीच्या संदर्भातील आदेश पोलीस आयुक्तांकडून निर्गमित होतात. हे करताना नेहमीच आपआपसात चर्चा केली जाते. त्यानुसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे व नाशिक शहर पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांनी संयुक्तपणे आपआपसात चर्चा करून, अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवांच्या वस्तु तसेच भाजीपाला विक्रेते दुकानदार यांची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ अशी निश्चित केली आहे.
त्यानुसार नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी, संचारबंदीच्या काळात भाजीबाजार, अधिकृत मटन, चिकन व अंडी विक्रीची दुकाने सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहतील अशा प्रकारचे आदेश नाशिक महानगरपालिका क्षेत्रासाठी दिले आहेत. यातून वैद्यकीय सेवा वगळण्यात आल्या आहेत तसेच दुग्ध पुरवठा सेवा*साठी शिथिलता देण्यात आली आहे, असे आदेश निर्गमित केले आहेत.
नागरिकांनी आदेशांचे पालन करणे हे जिल्ह्यातील करोना व्यवस्थापन असेच प्रभावी राहण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांनी केले आहे.