नाशिक : शहरात सुमारे शंभर वर्षांपूर्वी उभारलेल्या नाशिक शहर दल व ग्रामीण पोलीस दलातील कर्मचार्यांचे वास्तव्य असलेल्या पोलीस वसाहतींमधील घरे राहण्यायोग्य नसल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. गंगापूर रोडवरील पोलीस मुख्यालयातील कौलारू घरांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ झाल्यानंतर सर्व कौलारू चाळ आणि जीर्ण इमारती धोकादायक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही निवासस्थाने पाडून त्याठिकाणी अद्ययावत निवासी इमारती बांधण्याचा निर्णय पोलीस आयुक्तालयाने घेतला आहे.
शहरातील गंगापूररोडवरील पोलीस मुख्यालयात पोलिसांसाठी कौलारू चाळ व इमारती बांधण्यात आल्या आहेत. या चाळींमध्ये शेकडो पोलीस कुटूंबासह राहत आले आहेत. २००३ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी काही चाळी पाडून तिथे नवीन इमारती बांधण्यात आल्या. स्नेहबंधन पार्क या नवीन पोलीस वसाहतीचीही उभारणी झाली. आयुक्तालयाच्या विस्तारीकरणासाठी काही चाळ पाडून पोलीस आयुक्त कार्यालय उभाण्यात आले. दरम्यान, ही चाळ जीर्ण झाल्याने राहण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी येत होत्या.
पोलीस आयुक्तालयाच्या शिफारशीवरुन सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व घरांचे ऑडिट करुन अहवाल दिला आहे. त्यामुळे ही घरे धोकादायक असल्याने तेथे राहता येणार नसल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. त्यानुसार गंगापूररोडवरील पोलीस मुख्यालय, स्नेहबंधन पार्क आणि नाशिकरोडच्या पोलीस वसाहतीमध्ये जीर्ण इमारती आणि घरे पाडून तिथे नव्या इमारती उभारण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्यासाठी आयुक्तालयाने कार्यवाही सुरू केली आहे.
शेवटची नवी वसाहत 20 वर्षापूर्वी
गंगापूररोड आणि नाशिकरोड परिसरामध्ये ब्रिटीश कालीन कौलारू चाळी असून, गंगापूररोडवरील मुख्यालयात २०० पेक्षा अधिक खोल्या आहेत. नाशिकरोडमध्ये १२२ कौलारू खोल्या आहेत. सन १९९८ मध्ये पाथर्डी फाटा पोलीस वसाहतीत १२ इमारती उभारण्यात आल्या आहेत. शरणपूर रोडवरील स्नेहबंधन पार्कमध्येही ११ इमारती उभारल्या आहेत. देवळाली कॅम्पमध्ये १९८० मधील १६ जीर्ण सदनिका तोडून २००३ मध्ये १२ नवीन इमारती उभारण्यात आल्या आहेत.
बांधकाम विभागातर्फे मुख्यालयातील कौलारू घरे आणि नाशिकरोडच्या वसाहतींचा अहवाल प्राप्त झाला आहे. या ठिकाणी नव्याने कोणत्या स्वरुपाच्या आणि किती सदनिका उभारता येतील, याबाबतची चाचपणी सुरू आहे. त्याचा अंतिम अहवाल तयार झाल्यावर पुढील प्रक्रिया होईल. : अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक