नाशिक-पुणे रेल्वे मार्गाला विरोध

बाधितांना रेल्वे स्थानकात स्टॉल देण्याचे ‘महारेल’कडून आश्वासन

Opposition to Nashik-Pune Railway Line

अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला नाशिक-पुणे रेल्वेमार्ग मार्गी लागल्याने खरा सुवर्णत्रिकोण पूर्णत्वास येणार आहे. देशातील ही पहिली सेमी हायस्पीड ट्रेन असेल. त्यामुळे नाशिक-पुणे अंतर केवळ पावणेदोन तासांत गाठता येईल. नाशिकमधून जाणार्‍या या मार्गासाठी जमीन मोजणीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र आता नाशिक तालुक्यातील शेतकर्‍यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे. खासदार हेमंत गोडसे यांनीही गावकर्‍यांची भुमिका जाणून घेत या रेल्वेमार्गाचे नव्याने सर्वेक्षण करण्याबाबत महारेलच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा केली.

राज्य सरकारने केलेल्या १६ हजार १३९ कोटींच्या भरीव तरतुदीमुळे नाशिक-नगर-पुणे या २३५ किलोमीटरच्या रेल्वे दुहेरी मार्गाला गती मिळणार आहे. देशातील हा पहिलाच सेमी हायस्पीड मार्ग असून, नाशिक-पुणे अंतर विक्रमी दोन तासांच्या आत गाठता येणे शक्य होणार आहे. शिवाय या तिन्ही जिल्ह्यांचा मोठा विकास होणार आहे. भूसंपादनासह हा प्रकल्प साडेतीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. गेल्याच आठवड्यात ‘महारेल’च्या अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत या प्रकल्पाचा आराखडा सादर करण्यात आला. एका सर्वेक्षणानुसार नाशिक आणि सिन्नर तालुक्यातील २७ गावांमधून हा मार्ग जात आहे. यासाठी सुमारे २३३ हेक्टर जमीन संपादीत करण्यात येणार आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. च्या महारेल हे काम करणार आहे. प्रकल्पासाठी भुसंपादन प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, सिन्नर तालुक्यातील काही गावांसह नाशिक तालुक्यातील संसरी, नानेगाव व बेलतगव्हाण, विहितगाव गावातून प्रकल्पाला विरोध दर्शविण्यात आला आहे. ग्रामस्थांची मतं जाणून घेण्यासाठी महारेलचे अतिरिक्त जनरल मॅनेजर अतुल कुलकर्णी यांच्यासोबत खासदार हेमंत गोडसे, सुनिल आडके यांनी बाधीत शेतकर्‍यांसोबत संसरी गावातील मारूती मंदिरात बैठक घेत चर्चा केली. यावेळी संसरी गावातून रेल्वे मार्गाला प्रखर विरोध, नानेगाव येथे रेल्वेस्थानक, तर बेलतगव्हाण व विहितगाव शिवारातील जमिनीचा मोबदला बालाजी देवस्थानला न देता संपुर्ण रक्कम शेतक-यांना मिळावी यासह अनेक मागण्या करण्यात आल्या. संसरी गावातून झालेल्या विरोधाला पर्याय म्हणून नाशिकरोड स्थानकावरुन रेल्वे मार्ग होणार असल्याने त्यात बदल करुन देवळाली कॅम्प स्थानकावरुन रेल्वे मार्गाची सुरुवात केली तर विहितगाव, बेलतगव्हाण व संसरी गावांच्या जमिनी वाचतील त्यामुळे महारेलने नव्याने आराखडा तयार करण्याची सूचना खासदार हेमंत गोडसे यांनी केली. यावेळी सरपंच विनोद गोडसे, प्रशांत कोकणे, संजय गोडसे, अजय गोडसे, सुरेश गोडसे, बाळू गोडसे, सुखदेव आडके, कचरू रोकडे, सुरेश शिंदे, भगवान आडके, विजय आडके, कैलास आडके, संदीप रोकडे, अ‍ॅड. प्रतीक पाळदे, शरद पाळदे, अण्णा पाटील, किसन पाळदे, बाळासाहेब हगवणे, किरण पाळदे, बापू हगवणे, पोपट पागेरे, किरण कुटे, गिरीश हगवणे, कैलास पाटील आदि शेतकरी उपस्थित होते.

शेतकरी भूमिहिन होतील

नियोजित रेल्वे मार्गामुळे संसरी गावाचे मोठे नुकसान होणार असल्याची वस्तुस्थिती शेतकर्‍यांनी मांडली. नाशिक मुंबई रेल्वे लाईनच्या तिसर्‍या व चौथ्या लाईनसाठी पन्नास फुटापेक्षा जास्त जागेचे संपादन होत असल्याने पुन्हा गावाच्या दुसर्‍या बाजूने रेल्वे मार्ग गेला तर अनेक शेतकरी भूमिहिन होतील. यावेळी देवळाली कॅम्प येथून सुचवलेल्या दुसर्‍या मार्गाचे सर्वेक्षण केले असले, तरी उपस्थित अधिकारी वर्गाने त्या मार्गाबाबत अज्ञभिन्नता दाखवली. देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन मार्गे नवीन मार्ग अधिग्रहित केला तर सरकारी जमीनीवर प्रकल्प उभा राहू शकतो अशी माहिती शेतकरी आनंद गोडसे, विजय गोडसे आदींनी दिली.

रेल्वेस्थानक द्या तरच जमीन

नानेगाव येथील तळेबाबा मंदिरात झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी दहा प्रमुख मागण्या मांडत रेल्वेस्टेशन दिले तरच प्रकल्प होऊ देऊ, असे सांगितले. यावेळी शेतकर्‍यांची बाजू मांडली, मोजणी करा पण नवीन मार्गाचे सर्वेक्षणासह शेतकर्‍यांच्या सूचनांचा लेखी स्वरूपात पूर्ण करण्याबाबत आश्वासन मागितले.

महारेलची भूमिका

  • पंधरा दिवसांत मोजणी करून प्रत्येक गावातील गटनंबर प्रमाणेक्षेत्र निश्चित करणार
  • तीस मीटर रुंदीचे क्षेत्र मूळ रेल्वे मार्गासाठी व दोन्ही बाजूने तीस मीटर क्षेत्र रेड झोन यात सुरक्षेच्या दृष्टीने मोठे बांधकामाला बंदी
  • बाधितांच्या वारसांना रेल्वे स्थानकावर विक्री स्टॉल देणार

शेतकर्‍यांच्या मागण्या..

  • जमिनीच्या किंमतीच्या पाचपट मोबदला हवा
  • बेलतगव्हाण व विहितगावातील जमिनीच्या उता-यावर बालाजी देवस्थानचे नाव असले तरी मोबदल्याची सर्व रक्कम शेतक-यांना मिळावी.
  • रेल्वे मार्गाखालून शेतक-यांना शेतीसाठी पाईपलाईन साठी परवानगी
  • उता-यावरील नोंदी प्रमाणे मोबदला न मिळता सद्यस्थितीत पिके कोणती व किती वर्षांची आहेत त्याचे आयुष्यमान काढून मोबदला मिळावा.
  • रेल्वे मार्गाच्या तीस मीटर रेड झोन मध्ये बांधकाम व इतर कामांना परवानगी मिळावी.

बालाजी देवस्थानला मोबदला देऊ नये

विहितगाव व बेलतगव्हाण येथील शेतकर्‍यांनी शंभर टक्के मोबदला मिळावा अशी मागणी करत बालाजी देवस्थानला काही मोबदला देवू नये तर आम्ही जागा देवू अशी मुख्य मागणी केली.

बच्चू कडूंचे जिल्हाधिकारी यांना पत्र

प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांनी महारेलच्या रेल्वेमार्गाला नानेगाव, संसरी, बेलतगव्हाण, विहितगाव, शेवगेदारणा येथील शेतकर्‍यांचा विरोध असून नाशिकरोड, एकलहरे, सिन्नरसाठी यापूर्वी मंजूर असलेला प्रकल्प पूर्ण करावा, त्यासाठी नव्याने भूसंपादन करू नये असे पत्र दिले आहे.

देवळाली कॅम्प येथून सर्वेक्षण करावे : गोडसे

संसरी ग्रामस्थांच्या विरोधामुळे रेल्वे मार्गात बाधा येऊ नये, त्याचप्रमाणे नाशिकरोड स्थानकावरून होत असलेला रेल्वे मार्ग देवळाली रेल्वे स्टेशनवरून नव्याने आराखडा तयार केला तर कमीत कमी शेतकर्‍यांचे नुकसान होऊन रेल्वेचा खर्चही वाचणार आहे, त्या संदर्भात महारेलला सूचना दिल्या आहेत, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. तसेच रेल्वे मार्गाला लागणारे तीस मीटर क्षेत्र आरक्षित करताना बाधित क्षेत्र वगळता सबंधीत गट नंबरमधील दहा गुंठेच्या आतील उर्वरीत क्षेत्र त्याच प्रमाणे रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला काही भाग शिल्लक राहत असेल तर त्याचेही आरक्षण करुन शेतकरर्‍याला मोबदला देण्यात यावा, अशी मागणीदेखील खासदार गोडसे यांनी केली आहे.