घरमहाराष्ट्रनाशिकविजेअभावी जिल्ह्यातील फळबागा संकटात

विजेअभावी जिल्ह्यातील फळबागा संकटात

Subscribe

शेतीसाठी सलग आठ तास वीज पुरवठा करण्याची मागणी

सटाणा :  बागलाण तालुक्यात महावितरण कंपनीकडून सातत्याने सुरू असलेले वीज भारनियमन, अपुरा वीजपुरवठा, नादुरुस्त रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) तसेच, रोहित्रावर क्षमतेपेक्षा असलेला अतिरिक्त भार यांसह विजेच्या विविध समस्यांमुळे शेती संकटात सापडली आहे. महावितरणच्या हटवादी भूमिका आणि अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील फळबागांसह शेतीपिके उध्वस्त होत आहेत. दरम्यान, हा मुद्दा मांडत बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे वितरण व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली.

महावितरणने तालुक्यात सलग आठ तास अखंड वीजपुरवठा करून शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, यासंदर्भात माजी आमदार चव्हाण यांनी मुख्य अभियंत्यांना निवेदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेनुसार बागलाण तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी’ हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे. यानिमित्ताने तालुक्यातील गावोगावी ग्रामस्थांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. राज्यातील महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून या समस्या सोडवून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जात आहे. हा उपक्रम राबवताना तालुक्यातील गावागावांतून शेतकरी व ग्रामस्थांनी विजेसंदर्भात अनेक तक्रारी केल्या आहेत. वारंवार तक्रारी करूनही महावितरणचे संबंधित अधिकारी व कर्मचारी या प्रलंबित समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने जनतेमध्ये संतापाची भावना आहे.

- Advertisement -

बागलाण तालुका शेतीसाठी संपूर्ण राज्यात अग्रेसर असून तालुक्यात कांदा, मका, डाळिंब, द्राक्ष, भाजीपाला, टोमॅटो आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या पिकांना वेळेवर पाणी मिळाल्यास शेतजार्‍यांना दर्जेदार उत्पादन घेता येईल, परिणामी त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल. मात्र, महावितरणकडून तालुक्यात तासनतास वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने याचा परिणाम शेतीपिकांवर होत आहे. विद्युत पुरवठ्याअभावी अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान होत आहे.

पिकांसाठी येणारा खर्च व मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या बाबींकडे लक्ष देऊन शेतकर्‍यांना आठ तास सलग वीज द्या, रोहित्र दुरुस्त करा व क्षमतेपेक्षा अतिरिक्त भार असलेल्या रोहित्रांच्या ठिकाणी नवीन रोहित्र बसवण्याची मागणीही दीपिका चव्हाण यांनी केली आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करून लेखी कळवण्याची सूचनाही त्यांनी केली.

- Advertisement -

वितरणातच बिघाड

तालुक्यात अनेक ठिकाणी रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) नादुरुस्त अवस्थेत असून, महावितरणकडून त्यांची वेळेवर दुरुस्ती केली जात नाही. अनेक रोहित्रांवर क्षमतेपेक्षा अधिक भार असल्याने रोहित्र जळणे आणि वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याव्यतिरिक्त महावितरणकडून सक्तीची वसुली करून ग्रामीण भागात तासन्तास भारनियमन सुरू आहे. वीज पुरवठ्यातील हा बिघाडच शेतीक्षेत्र उध्वस्त करणारा ठरतो आहे.

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -