घरमहाराष्ट्रनाशिककरोना नियमांनी लग्नांचा वाजला बॅण्ड

करोना नियमांनी लग्नांचा वाजला बॅण्ड

Subscribe

कुणाला येऊ नका असे ऐनवेळी कसे म्हणायचे; आयोजकांना प्रश्न

नाशिक : ओमायक्रॉनच्या धर्तिवर राज्य सरकारने लग्न समारंभांवर निर्बंध घातल्याने रविवारी पहिल्याच दिवशी याची अंमलबजावणी करताना वधु-वरांसह आयोजकांचाही ‘बॅण्ड’ वाजला. ऐनवेळी वर्‍हाडींपैकी कुणाला येऊ नका असे म्हणायचे यातच सगळा गोंधळ झाला. पोलिसांनी पहिल्या दिवशी कुणावरही कारवाई केलेली नाही. त्यामुळे रविवारी नियमांचाही ‘बॅण्ड’ वाजला.

डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात लग्नांच्या अनेक तारखा आहेत. शुभमुहुर्तावर लग्न लावण्यासाठी वधु-वरांसह त्यांच्या मात्यापित्याची एकच लगबग सुरु आहे. गेल्या महिन्याभरापासून लग्नाची तयारी सुरु असल्यामुळे हजारो नागरिकांना लग्नाचे निमंत्रण पोहोचले. पत्रिकाही पोहोचल्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आग्रहाचे निमंत्रणही पोहोचले. त्यामुळे लग्नाला तुडुंब गर्दी होणार याद़ृष्टीने नियोजन केलेल्या आयोजकांना या नियमांमुळे भर थंडीत घाम फुटला आहे. ऐनवेळी कुठल्या पाहुण्यांना नाही म्हणायचे आणि कुणाला या म्हणायचे, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे रविवारी पार पडलेल्या लग्न सोहळ्यांना गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.

- Advertisement -

लॉन्सबाहेर गाडी लावण्यापेक्षा लांब गाडी लावून लग्नात सहभागी झालेले वर्‍हाडी लग्न लागताच निघून गेले. पाहुण्यांसह जेवणार्‍या वर्‍हाडींवरही निर्बंध आल्याने लग्नाचा गोडावा काहीसा कमी झाल्याचे दिसून आले. परंतु, आता माघार नाही म्हणून कमी आवाजातही लग्नाचा बॅण्ड वाजवला गेला. या आठवड्यात लग्न तारखा असल्याने त्यावरही निर्बंध येण्याची शक्यता वर्तवली जाते.पोलिसांनी पहिल्याच दिवशी नियमांना तिलांजली दिली. एकाही लॉन्सवर किंवा आयोजकांवर कारवाई झालेली नाही. यातून लग्नांचा बॅण्ड वाजलेला असला तरी पोलिसांनी त्याकडे अजून गांभार्याने बघितलेले नसल्याचे दिसून येते

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -