नाशिकमध्ये पोलिसांविरोधात नागरिकांचा आक्रोश मोर्चा

पंचवटीतील डाळिंब विक्रेत्याच्या हत्येनंतर जनक्षोभ, हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी

Akrosh Morcha Nashik Panchavati

पंचवटी – दिंडोरीरोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज आटोपून पेठरोडकडून मंगळवारी (दि.२३) रात्री उशिरा घरी जाणार्‍या भाजीपाला व्यापारी राजेश वकील शिंदे यांची मध्यरात्रीच्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. या प्रकरणी संशयित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शासन करीत न्याय मिळावा, यासाठी गुरुवारी (दि.२५) पंचवटी पोलीस ठाण्यावर मयत शिंदे यांचे नातेवाईक व भराडवाडी परिसरातील नागरिकांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

मृत राजेश शिंदे यांच्या नातेवाईकांसह मित्रपरिवार सकाळपासून पंचवटी पोलीस ठाण्यात जमला होता. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव पंचवटी पोलिसांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. यानंतर हे सर्व नागरिक पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळच सुमारे दोन तास बसून आपला आक्रोश व्यक्त करीत होते. यावेळी त्यांनी पोलिसांना आपल्या मागण्यांचे निवेदनही दिले यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजेश शिंदे यांच्या मारेकर्‍यांना तात्काळ अटक करावी. हा खून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून, सरकारी वकील देण्यात यावेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन, न्यायचे राज्य स्थापन करण्याची मागणी केली आहे. तसेच राजेश शिंदे हे त्यांच्या कुटुंबियांचे कर्ता पुरुष व आधारस्तंभ होते. त्यामुळे शासनाने त्यांना १० लाख रुपयांची मदत करावी असे म्हटले आहे.

उपस्थित पोलीस अधिकार्‍यांनी संतप्त नागरिकांचे निवेदन स्वीकारत या प्रकरणातील संशयित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले. दुपारी दीड वाजेपर्यंत हा जमाव पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वार जवळ बसून होता.