घरमहाराष्ट्रनाशिकभाजप-शिवसेनेला फाजील आत्मविश्वास, पंधराही मतदारसंघात टसन

भाजप-शिवसेनेला फाजील आत्मविश्वास, पंधराही मतदारसंघात टसन

Subscribe

पंतप्रधान मोदींची लाट, फडणवीस यांच्या कामाचा करिष्मा, शिवसैनिकांमध्ये संचारलेले भगवे वादळ आदी बाबींकडे अंगुलीनिर्देश करीत युतीचे उमेदवार निवडून येण्याचा फाजील आत्मविश्वास बाळगून असल्याचे चित्र जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघामध्ये दिसत आहे. प्रत्यक्षात या मतदारसंघात फेरफटका मारला असता प्रत्येक ठिकाणी आघाडीने पूर्ण ताकद पणाला लावली असून परिणामी कोणतीही लढत एकतर्फी होणार नाही अशी परिस्थिती दिसते.

पंतप्रधान मोदींची लाट, फडणवीस यांच्या कामाचा करिष्मा, शिवसैनिकांमध्ये संचारलेले भगवे वादळ आदी बाबींकडे अंगुलीनिर्देश करीत युतीचे उमेदवार निवडून येण्याचा फाजील आत्मविश्वास बाळगून असल्याचे चित्र जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघामध्ये दिसत आहे. प्रत्यक्षात या मतदारसंघात फेरफटका मारला असता प्रत्येक ठिकाणी आघाडीने पूर्ण ताकद पणाला लावली असून परिणामी कोणतीही लढत एकतर्फी होणार नाही अशी परिस्थिती दिसते. भाजपची लाट यंदा बर्‍यापैकी ओसरली असल्याची बाबही ग्रामीण भागाचा कानोसा घेतला असता पुढे येते.

लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर विरोधी पक्षाला मोठा झटका लागला होता. या निवडणुकीत राज्यात युतीचे ४१ तर विरोधी पक्षातील केवळ सातच उमेदवार निवडून आलेत. त्यातील नवनीत कौर यांनी भाजपला पाठिंबा दिला. तर खा. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी शड्डू ठोकला. त्यामुळे विरोधकांचे राज्यात केवळ पाच खासदार शिल्लक आहेत. परिणामी, विरोधी पक्षातील नेत्यांची काही काळासाठी बोलती बंद झाली होती. ही परिस्थिती बघता विधानसभा निवडणुकीत आपल्याला आता प्रचाराची गरजच नाही, मोदींची लाट टिकून आहे. मतदार फडणवीस सरकारवर बेहद खुश आहे अशा प्रकारचा गैरसमज युतीच्या उमेदवारांमध्ये दिसतो. त्यामुळे प्रचार करताना या उमेदवारांमध्ये फाजील आत्मविश्वासच अधिक दिसतो. या आत्मविश्वासापोटी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रचार करण्याचे प्राथमिक कर्तव्यही पायदळी तुडवले जात असल्याचे दिसते. जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघाचा आढावा घेतला असता प्रत्येक ठिकाणी युतीच्या उमेदवारांपुढे कडवे आव्हान निर्माण झाल्याचे दिसते.

- Advertisement -

पूर्व नाशिक मतदारसंघात भाजपने ऐनवेळी अ‍ॅड. राहुल ढिकले यांना उमेदवारी दिल्याने बहुतांश ‘भाजपेयी’ नाराज आहेत. पश्चिम नाशिक मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला शिवसेनेच्या बंडखोरांनीच आव्हान दिले आहे. त्यामुळे मतांची विभागणी होण्याचा मोठा धोका आहे. महत्वाचे म्हणजे शिवसेनेचे जवळपास सर्वच नगरसेवक व पदाधिकारी बंडखोराच्या प्रचारात सर्रासपणे सहभागी होत आहे. मध्य नाशिक मतदारसंघात काँग्रेस आणि मनसेने तगडे आव्हान भाजपच्या उमेदवाराला दिले आहे.

देवळाली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला आघाडीने घाम फोडला आहे. या मतदारसंघाचा अनेक वर्षांपासून विकासच झालेला नसल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. दिंडोरी मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवारावर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदारांनी हाबी ठरत आहेत. निफाड मतदारसंघात शिवसेनेच्या आमदाराची मते खाण्याचे काम त्यांचा अपक्ष म्हणून उभे असलेले त्यांचे चुलतभाऊच करणार असल्याचे दिसते. देवळा मतदारसंघात आघाडीची ताकद वाढली असून विद्यमान आमदारांची निष्क्रीयता त्यांना मारक ठरणार असल्याचे दिसते. बागलाण मतदारसंघात आघाडीच्या विद्यमान आमदारांना आव्हान देणे युतीला जिकरीचे जात आहे. तर मालेगाव मध्य मतदारसंघात युतीला आजवर कधीही विजय संपादन करता आलेला नाही. मालेगाव बाह्य मतदारसंघात राज्यमंत्र्यांवरील नाराजी आणि आघाडीच्या उमेदवाराचे नातेसंबंध यामुळे युतीला फटका बसण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नांदगाव मतदार संघात युतीच्या वतीने शिवसेनेला उमेदवारी मिळाली असली तरीही भाजपचा बंडखोर मतांचे धृवीकरण करण्यास पुरेसा ठरणार आहे. येवला मतदारसंघात युतीच्या उमेदवारासमोर भुजबळांचे बलाढ्य आव्हान असेल. सिन्नर मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराची आघाडीबरोबर टस्सर फाईट होणार आहे. इगतपुरी मतदारसंघात शिवसेनेने काँग्रेसच्या माजी आमदाराला शिवबंध बांधून उमेदवारी दिल्याने आघाडी एकदिलाने त्यांच्याविरोधात काम करण्यासाठी उभी ठाकली आहे. सुरगाणा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच माकपचे प्राबल्य असते. अशा प्रकारे पंधराही मतदार संघात युतीच्या उमेदवारांना ‘टफ फाईट’ द्यावी लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही लढती एकतर्फी होणार नाही हे स्पष्ट होत आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -