नाशकात रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन; ९ गुन्हेगारांवर कारवाई

नाशिक : गुन्हेगारीला ‘अंकुश’ ठेवण्यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून रात्रभर शहरात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. पोलिसांनी नऊ गुहेगारांवर कारवाई केली. या ऑपरेशनमध्ये दोन सहायक पोलीस आयुक्त, २१ पोलीस अधिकारी, ११० पोलीस अंमलदार, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक सहभागी झाले होते.

शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शनिवारी (दि.२१) मध्यरात्री १ ते रविवारी (दि.२२) पहाटे ४ वाजेपर्यंत पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखाली म्हसरुळ, पंचवटी, उपनगर पोलीस ठाणेहद्दीत कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. यामध्ये तडीपार, हिस्ट्रीशीटर, फरार गुन्हेगारांचा शोध घेत कारवाई करण्यात आली. पोलीस ठाणेनिहाय टीम तयार करुन कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले होते. २१ तडीपारांची तपासणी करण्यात आली. त्यात तीन तडीपार विनापरवानगी शहरात वास्तव्य करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. १८ हिस्ट्रीशीट गुन्हेगारांपैकी १० गुन्हेगार मिळून आले. पोलिसांनी गुन्ह्यात पाहिजे असलेल्या १० आरोपींपैकी सहा जणांना ताब्यात घेतले.