Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र दंड भरता की प्रकरण मॅनेज करता?; ऐका अतिक्रमण निर्मूलन विभाग कर्मचाऱ्याची कॉल...

दंड भरता की प्रकरण मॅनेज करता?; ऐका अतिक्रमण निर्मूलन विभाग कर्मचाऱ्याची कॉल रेकॉर्डिंग

Subscribe

प्रशांत सूर्यवंशी । नाशिक

अतिक्रमणांकडे डोळेझाक करत स्वतःची तुंबडी भरणारे कर्मचारी जप्त साहित्य परत देतानाही लाचखोरी सोडत नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. पंचवटीतील एका पालिका कर्मचार्‍याने भाजीविक्रेत्या महिलेच्या पतीकडे लाच मागतानाच त्याला धमकीही दिली. या संवादाचे कॉल रेकॉर्डिंग दै. आपलं महानगरच्या हाती आले असून, यानिमित्ताने पालिकेतील गुंडप्रवृत्तीने बरबटलेल्या कर्मचार्‍यांची मक्तेदारीदेखील समोर आली आहे. कर्मचार्‍यांच्या या लाचखोरीविरोधात संबंधित विभागाच्या उपायुक्त कारवाई का करत नाहीत? त्यांची मूग गिळून बसण्याची भूमिका संशयाचे वातावरण निर्माण करत आहे.

- Advertisement -

पंचवटीतील जनार्दन स्वामी मठापासून काही अंतरावर असलेल्या निलगिरी बागेजवळील चौफुलीवर मोठ्या प्रमाणावर भाजीबाजार भरतो. हा बाजार थेट रस्त्यावरच मांडला जात असल्याने स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही अधिकार्‍यांची डोळेझाक सुरू होती. अखेर या भाजीविक्रेत्यांवरील कारवाईसाठी महापालिका प्रशासनाला बुधवारचे (दि.१०) मुहूर्त सापडले. या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत पथकाने अतिक्रमित टपर्‍या, भाजीच्या टोपल्या, वजनकाटे असे सर्वच साहित्य जप्त केले. या कारवाईने रस्त्याने मोकळा श्वास घेतला. त्यामुळे पालिका कर्मचार्‍यांविषयी स्थानिक रहिवाशांमध्ये आदराची भावना निर्माण झाली होती. या कारवाईला काही तास लोटत नाही तोच, समोर आलेल्या एका कॉल रेकॉर्डमुळे पालिकेच्या संपर्ण कारवाईवर पाणी फेरले गेले. यानिमित्ताने चहापेक्षा किटली गरम असा अनुभव नागरिकांनी घेतला.

अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत ज्या भाजीविक्रेत्या महिलेचे साहित्य पथकाने जप्त केले होते, त्या पथकातील एका कर्मचार्‍याला भाजीविक्रेत्या महिलेच्या पतीने फोन केला. आपली ओळख सांगितल्यानंतर जप्त केलेले वजनकाटे परत देण्याची मागणी केली. त्यावर कर्मचार्‍याने व्हॉट्सअ‍ॅपला फोटो टाका, दंड भरावा लागेल, असे सांगितले. तसेच, दंड भरताय की मॅनेजमेंट करता, असा पर्यायदेखील कर्मचार्‍याने दिला. या वाक्यानंतर महिलेच्या पतीने दंड भरू, मॅनेजमेंटही करू. पण, मी आत्ता येतोय आयुक्त कार्यालयात. तुम्ही एकतर पावत्या देेत नाहीत. कालच्या मोहीमेत तुम्ही बायांना (महिलांना) छेडछाड केली. त्यातून तिला (पत्नीला) पायाला लागलं. महिलेच्या पतीचे हे वाक्य संपत नाही तोच, पालिका कर्मचार्‍याने धमकीच्या शैलीत, आपल्याविरोधात पोलीस स्टेशनला जा आणि ३७६ (बलात्काराचा गुन्हा) टाकून दे. पोलिसांना सांग की बायांना छेडछाड केली, असा धमकीवजा सल्लाही दिला. हा कर्मचारी अर्धवट शिकलेला गुंडप्रवृत्तीचा असावा, कारण मॅनेज म्हणण्याऐवजी तो मॅनेजमेंट म्हटला. शिवाय, त्याचे बोलणे अत्यंत उद्दाम होते. त्याची ही धमकी ऐकल्यानंतर महिलेच्या पतीने आपण हा कॉल रेकॉर्ड करत असल्याचे त्याला सांगितले. त्यावर संतापलेल्या कर्मचार्‍याने, हे रेकॉर्ड, मुख्यमंत्र्याला दे देवेंद्र फडणवीसला, असे सांगितल्यानंतर कॉल कट झाला.देवेंद्र फडणवीस हे विद्यमान मुख्यमंत्री नाहीत, हे कदाचित पैसे खाण्याच्या नादात या कर्मचार्‍याला लक्षात आले नसावे.

- Advertisement -

महापालिकेच्या वरिष्ठांनी तातडीने कर्मचार्‍यांच्या बदल्यांच्या माध्यमातून अंतर्गत साफसफाईला सुरुवात करावी. अन्यथा, भविष्यात अधिकार्‍यांचीही इभ्रत अशा पद्धतीने पालिकेच्या दाराशी टांगलेली दिसेल. महत्वाचे म्हणजे पालिकेच्या कर्मचार्‍यांकडून इतक्या खुलेआमपणे गुंडगिरी सुरू असताना अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त संबंधितांवर कारवाई करायला तयारच होत नाहीत. उपायुक्तांना संबंधितांची भीती आहे की ते जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे आता अतिक्रमणे आणि कर्मचार्‍यांची मुजोरी पाहता उपायुक्तांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

कर्मचार्‍यांवर अधिकारी मेहेरबान

महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांत १०-१० वर्षे लोटूनही बहुतांश कर्मचार्‍यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे हे कर्मचारी अत्यंत मुजोर बनले आहेत. आपली बदली कुणीही करू शकणार नाही, या त्यांच्या मानसिकतेला अधिकार्‍यांचेही पाठबळ लाभते आहे. नियमानुसार ३ वर्षांनी कर्मचार्‍यांच्या बदल्या होणे अपेक्षित असताना, वर्षांनुवर्षे त्यांच्यावर मेहेरबानी दाखविणार्‍या मुख्यालयातील अधिकार्‍यांचीच आता चौकशी करण्याची वेळ आली आहे. या अधिकार्‍यांच्या प्रेमामुळेच कर्मचारी स्वतःला प्रशासन प्रमुख समजू लागले आहेत. त्यांचा हा भ्रमाचा भोपळा आता आयुक्तांनीच फोडण्याची गरज आहे. अन्यथा, कर्मचार्‍यांच्या भ्रष्ट कारभारामुळे महापालिकेची इभ्रत चव्हाट्यावर यायला वेळ लागणार नाही. सातपूर, नाशिकरोड, सिडको, पंचवटी, नाशिक पूर्व आणि पश्चिम या सर्वच कार्यालयांत कर्मचारी तळ ठोकून आहेत. या कर्मचार्‍यांच्या बदल्या करताना थेट विभागच बदलला पाहिजे, जेणेकरुन यांची मक्तेदारी संपुष्टात येईल आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव होईल.

कर्मचारीच हॉकर्स अन् वसुलीबाज

महापालिकेतील काही कर्मचार्‍यांच्या स्वतःच्या खाद्यपदार्थांच्या गाड्या आहेत. राजकीय नेत्यांच्या पायाशी लोळण घेणार्‍यांनी आपल्या पदरात कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या नावाने हॉकर्सच्या जागा लाटल्या आहेत. तर, काही कर्मचारी नेत्यांचे हस्तक म्हणून स्वतःच परस्पर हप्तेवसुली करतात. त्यामुळे या कर्मचार्‍यांचा रुबाब एखाद्या अधिकार्‍याला लाजवेल असा असतो. दिमतीला चारचाकी वाहन, हाताखाली दोन-चार कर्मचारी असा लवाजमा अधिकार्‍यांच्याही नशिबात नाही. या कर्मचार्‍यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी हॉकर्स म्हणून जाहीर केलेल्या व्यक्तींसह जागांचे फेरसर्वेक्षण करण्याची गरज आहे. यात पालिकेने त्रयस्त संस्थेमार्फत लाभार्थ्यांची पडताळणी करावी.

कॉल रेकॉर्डिंग ऐका 

https://www.facebook.com/watch/?v=788164279555119

- Advertisment -