मोरांची हत्या करणारे शिकारी ताब्यात, दोघांवर काळवीट शिकारीचाही गुन्हा

संशयितांकडून मृतावस्थेतील मोर व शिकारीचे साहित्य जप्त

नांदगाव : राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची हत्या करणार्‍या दोघा संशयितांना पोलीस व वन विभागाने संयुक्त कारवाई करत तालुक्यातील भार्डी व धनेर शिवारात ताब्यात घेतले. जनावरे चोर असल्याचा संशयावरून ताब्यात घेतलेले मुद्स्सीर अहेमद अकिल अहेमद, जाहिद अक्तर सईद अहेमद (रा.मालेगाव) संशयीत हे दोघे सराईत गुन्हेगार असून नाशिकच्या येवला, मालेगाव, नांदगाव आदी वन विभागाच्या ठिकाणी त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. या दोघा संशयितांकडून मृतावस्थेतील मोर व शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, या दोघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवस कोथडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यात सध्या जनावरे चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. या चोरांच्या मागावर पोलीस व नागरिक दोन्हीही असताना तालुक्यातील भार्डी व धनेर शिवारातील जनावरे चोरून चोरटे पसार होत असतांना स्थानिक ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी या चोरट्यांचा पाठलाग केला. परिसरात गस्तीवरील नांदगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर यांना याबाबत माहिती दिली. दोन संशयीत याच दरम्यान तिथे आले व हिंदी बोलू लागल्याने ग्रामस्थांना संशय आला व त्यांनी या दोघांना पकडले.

गस्तीवरील दीपक सुरवडकर यांनी या दोघांना पोलीसी खाक्या दाखवताच त्या दोघांनीही जनावरे चोरली नसून मोराची शिकार केल्याचे सांगितले. यावेळी या चोरट्यांची झडती घेतली असता त्यांचेकडून मृतावस्थेतील मोर पक्षी, लोखंडी बॅरेल असलेली बंदूक, बुलेट्सची डबी (गोळ्या) कोयता, सुरा, लायटर, विद्युत टेस्टर, कटर, सर्च लाईट, ऑईल बॉटल आदी शिकार करण्याचे साहित्य मिळाले. याबाबत वनविभागाला कळवण्यात येऊन शिकारीचे साहित्य व दोन्ही संशयितांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. वनविभागात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे दोघे संशयित सर्‍हाईत गुन्हेगार असून यापूर्वीही काळवीट शिकार प्रकरणी त्यांचेवर नाशिकच्या मालेगाव, नांदगाव, येवला तालुक्यातील वनविभागाकडे गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमध्ये वनक्षेत्रपाल चंद्रकांत कासार, वनपाल तान्हाजी भुजबळ, अशोक सोनवणे, मगन राठोड, दीपक वडगे, वनरक्षक राजेंद्र दौंड, नाना राठोड, अजय वाघ, प्रफुल्ल पाटील, सुरेंद्र शिरसाठ, चंद्रकांत मार्गेपाड, रवींद्र शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर, पोलीस हवालदार सावकारे, नंदकिशोर पिंपळे आदी सहभागी होते.