घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपेठ : सर्रास जीवघेणी वाहतूक; प्रशासनाचे डोळ्यांवर हात

पेठ : सर्रास जीवघेणी वाहतूक; प्रशासनाचे डोळ्यांवर हात

Subscribe

पेठ : तालुक्यातील खाजगी अवैध प्रवासी वाहतूक खुलेआम सुरू आहे. मात्र जेव्हा एखादा भिषण अपघात घडतो तेव्हा निरपराधांना आपला जीव गमवावा लागतो. तेव्हा संबधित यंत्राणा खडबडून जागी होते. पेठ हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे विविध शासकीय कामे बाजार व इतर कामानिमित्त तालुकाभरातील नागरिकांची वर्दळ असते. प्रश्न येतो तो दळणवळणाची प्रवासातील. शहरात तालुक्यातील चोहो बाजूने येणारे नागरिक हे बहुतांश खासगी वाहनाने प्रवास करतानाचे चित्र आहे. या वाहनांचे गावनिहाय पट्टे ठरलेले आहेत.

मात्र, या प्रवासी वाहतूक करणारे कित्येक वाहनधारक हे अप्रशिक्षित असतात. काहींकडे वाहन चालवण्याचा परवाना नसतो. वाहनाचे कोणतेही अधिकृत असे कागदपत्रे नसतात. कित्येक वाहने भंगारात निघालेली असूनही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी खचाखच भरुन प्रवास करतांना दिसतात. संबंधित नियंत्रण ठेवणार्‍या यंत्रणांची डोळेझाक व आर्थिक हितसंबंध जोपासत बिनदिक्कतपणे सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक तालुक्यात कोणाच्या आशिर्वादामुळे सुरू आहे? हा जनसामान्यांना पडलेला गहन प्रश्न आहे. सोमवारी (दि.३१) तालुक्यातील चिखलीनजीक झालेल्या अवैध प्रवासी अपघातातून प्रशासनानेही नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाकरिता ठोस उपाय योजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

पेठ एसटी आगार कोमात

जनसामान्यांची जीवनवाहिणी म्हणून जिच्याकडे पाहिले जाते ती एसटी महामंडळाची प्रवासी बससेवा मात्र पेठ तालुक्यात या बससेवेचा पुरता बोजवारा उडालेला असल्याचे चित्र दिसून येते. सद्यस्थितीत या आगारात ३७ बसेस असून त्यापैकी मानव विकासच्या ११ बस आहेत. यापैकी ४ बस नादुरूस्त असल्याने नाशिक येथील वर्कशॉपला दुरुस्सीसाठी पाठविण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येते. येथील आगारातून दिवसभरात ८२ फेर्‍या होतात. सद्या या आगारात ३३ बसेस कार्यरत असल्या तरी त्यांचीही यांत्रिक शक्ती इच्छितस्थळी सुखरूप पोहोचवेल याची शाश्वती खुद्द चालकालाही देता येत नाही. नेहमीच देधक्का असलेले या आगारात मार्गस्थ होणार्‍या बसचे आगारातून निघतांना व्यवस्थित तपासणी केली जात नसल्याने अर्ध्या रस्त्यातच अनेकदा बसेस नादुरूस्त अवस्थेत दिसत असतात. तालुक्यातील गावोगावी एसटी बससेवा सुरळीत सुरू राहिली तर अवैध वाहतुकीस नक्कीच आळा बसेल.

वाहतूक पोलिसांचा कानाडोळा

पेठ शहरातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने शहरात वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत असतो. परंतु ज्यांच्यावर वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी आहे ते शहरात न दिसता महामार्गावरील नाकेबंदीतच व्यस्त असल्याचे चित्र आहे. नाशिक-पेठ या राष्ट्रीय महामार्गावर दररोज जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांचे वाहन त्यांच्या ताफ्यासह नाशिकपासून ते गुजरात सरहद्दीपर्यंत वाहन तपासणी करतांना दिसून येते. मात्र यांनी अवैध प्रवासी वाहतुकीबाबत ठोस अशी कारवाई केल्याचे दिसून येत नाही.

- Advertisement -

आरटीओ चेक नाका नेमका करतो तरी काय ?

पेठ शहरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर आरटीओ चेक नाका असला तरी याच मार्गावरुन मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू असली तरी ते डोळेझाक करून फक्त लाईनवरील मोठमोठी अवजड वाहने यांचीच पाहणी व वसुली करत आहेत. मार्गावरील या चेक नाक्यामुळे येथे अनेकदा अपघात घडले आहेत. वाहतुकीस वारंवार खोळंबा निर्माण होत असतो. याबाबत ना लोकप्रतिधी ना अधिकारी दखल घेतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -