नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या सहा महिन्यांत ११९ लाचखोरांना रंगेहाथ पकडले. मात्र, या विषयावर प्रशासनाकडून कोणतीही ठोस पाऊले उचलली जात नाहीत. भ्रष्टाचाराविरोधात सर्वसामान्यांमध्ये संतापाची भूमिका असून, या भ्रष्टाचारी लोकसेवकांच्या फोटोंचे प्रदर्शन लावण्याचा निर्णय निर्भय महाराष्ट्र पक्षाने घेतला आहे.
मुंबई नाका भागातील यशवंत नगरात ९ व १० सप्टेंबर रोजी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारी लोकसेवकांना रंगेहाथ ताब्यात घेतल्यानंतरही शासकीय कर्मचार्यांकडून नागरी कामांसाठी नाशिककरांची पिळवणूक व अडवणूक सुरूच आहे. याविषयी नाशिककरांमध्ये प्रचंड रोष आहे.
लाच स्विकारताना ताब्यात घेतल्यानंतरही अधिकारी पुन्हा सेवेत रूजू होतात. निलंबनाच्या काळातही नागरिकांच्या कररुपी पैशांतून या अधिकार्यांचे वेतन सुरू असते. नाशिकमध्ये सहा महिन्यांत ११९ भ्रष्टाचारी लोकसेवकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आढळून आली आहे. एवढेच नव्हे तर अपसंपदेप्रकरणी गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र, तरीही प्रशासकीय व्यवस्थेत कोणतीही सुधारणा होत नसल्याने भ्रष्टाचारमुक्त नाशिक जनसंग्रामचा नारा देऊन निर्भय महाराष्ट्र पक्षाने फोटो प्रदर्शनाचे अनोखे पाऊल उचलले आहे. या सर्व भ्रष्टाचारी लोकसेवकांवर कारवाई होण्यादृष्टीने त्यांच्या फोटोेचे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याचे पक्षाचे संस्थापक जितेंद्र भावे यांनी सांगितले.