घरमहाराष्ट्रनाशिकआता महिलाही चालवणार नाशकात पिंक रिक्षा..

आता महिलाही चालवणार नाशकात पिंक रिक्षा..

Subscribe

महापालिका महिला व बालकल्याण विभागाकडून दिले जाणार परवाने,प्रशिक्षण

महिलांना प्रवासात सुरक्षिततेची हमी देणार्‍या पिंक रिक्षा नाशिकच्या मार्गांवर धावण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून शहरातील महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण व परवाने दिले जाणार आहेत.पालिकेच्या बजेटमध्ये यासंदर्भातील तरतूद करण्यात आल्यानंतर पालिकेने या योजनेचा शुभारंभ केला असून गरजू महिलांकडून प्रशिक्षण व परवान्यासाठी अर्ज मागवले आहेत.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुचकामी बनली आहे. त्यातच शहर बसेसची संख्याही कमी झाल्याने महिला व विद्यार्थीनींना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या महिला व विद्यार्थिनींकडून प्रवासासाठी खासगी रिक्षाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो; परंतु या रिक्षांमधून प्रवास करताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शहरात रिक्षामध्ये महिलांची छेडछाड होण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंक रिक्षा दिल्ली, मुंबई, पुण्यानंतर प्रथमच नाशिक शहरातील रस्त्यांवरही आता धावणार आहेत. स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या प्रस्तावानुसार योजना राबवण्यात येणार आहे. महिलांसाठी स्वतंत्र वाहतुकीची व्यवस्था असावी. शिवाय ती महिलांनीच चालवलेली असावी अशी ही संकल्पना आहे.

- Advertisement -

प्रशासकीय पातळीवर या योजनेचा अभ्यास केल्यानंतर ही योजनेची अंलबजावणी आता सुरू झाली आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या अखत्यारित महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमांतर्गत पिंक रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. त्यासाठी इच्छुक महिलांची संख्या नसल्याने महापालिकेने आता इच्छुक महिलांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. पिंक रिक्षा अंतर्गत प्रशिक्षण हवे असल्यास महिलांनी महापालिकेकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन महिला व बालकल्याण विभागाकडून करण्यात आले आहेत. यासाठीअर्ज महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळांवर तसेच महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. परिपूर्ण भरलेले अर्ज कागदपत्रासहित महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात ३० ऑगस्टपर्यंत सादर करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

या महिलांना घेता येईल प्रशिक्षण

पिंक रिक्षा चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी काही कागदपत्रे आवश्यक असणार आहे. यात नाशिकमध्ये ३ वर्ष रहिवास असल्याचा दाखला व शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संबंधित महिलेचे शिक्षण किमान आठवी उत्तीर्ण इतके असावे. प्रशिक्षणासाठी १८ वर्ष वयाची अट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -