खेळाची मैदाने की तळे?

महापालिकेसह जिल्हा परिषदेच्या मैदानांवर साचले पाणी

नाशिक : गेल्या आठवडापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत असताना शहरातील मैदानांवर तळे साचले आहेत. महापालिकेच्या मैदानांसह महात्मा गांधी रोडवरील जिल्हा परिषदेच्या मैदानावर पाणी साचल्याने डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. या दूषीत पाण्यामुळे आता परिसरात रोगराईचे साम्राज्य निर्माण होत असल्याने पालिकेने याकडे त्वरीत लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पावसाळ्यात ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिकेने साचलेल्या पाण्यासंदर्भात विशेष मोहिम राबवून उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यातच आता शहरातील मैदानांना तळ्यांचे स्वरुप आल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सातपूर औद्योगिक वसाहतीमधील मैदानावरही तुडूंब पाणी साचले आहे. त्यामुळे जॉगिंग ट्रॅकही बंद झाला आहे. दुसरीकडे महात्मा गांधी रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्येही पाणी साचले आहे. या पाण्यामुळे कानाकोपर्‍यात फेकलेल्या कचर्‍याची दुर्गंधी सुटली आहे. तर, फेकलेल्या दारुच्या बाटल्या पाण्यात तरंगताना दिसत आहेत. हे पाणी काढून मैदानाची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांसह खेळाडूंकडून होत आहे.