घरमहाराष्ट्रनाशिककळवण-देवळा रस्त्याची खड्ड्यांमुळे दुर्दशा

कळवण-देवळा रस्त्याची खड्ड्यांमुळे दुर्दशा

Subscribe

सार्वजनिक बांधकाम विभाग बघ्याच्या भूमिकेत

राकेश हिरे । कळवण
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली असून मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या कळवण – देवळा रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.कळवण – देवळा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने ‘खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा’ हे शोधण्याची वेळ वाहनचालकांवर आली असून खड्ड्यांच्या त्रासामुळे वाहनचालकांना वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे.

कळवण तालुक्यातील काही प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या कळवण – देवळा रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.तर काही ठिकाणी सलग रस्ता खराब झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.एकीकडे उत्कृष्ट रस्त्यांसाठी कळवण तालुक्याचे उदाहरण दिले जात असताना कळवण तालुक्यातील प्रमुख रस्तेच खड्ड्यांच्या अग्रस्थानी असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीबद्दल सर्वसामान्य नागरिक आणि वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कळवण – देवळा रस्ता हा मोठ्या प्रमाणात रहदारीचा रस्ता असून ह्या रस्त्याची अवस्था ‘सांगताही येईना आणि सहनही होईना’ अशी झाली आहे. ह्या रस्त्याचा सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक आणि शेतकरी दैनंदिन वापर करत असतात.मात्र गेल्या काही वर्षांपासून ह्या रस्त्यावरील प्रवास अत्यंत खडतर झाला असल्याने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि वाहनचालकांनी केली आहे.

- Advertisement -

सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल नाराजी

कळवण तालुक्यातील वेगवेगळ्या रस्त्यांच्या दुर्दशेमुळे वाहनचालक त्रस्त झाले असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसते.वाहनचालक,शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यांच्या दुर्दशेमुळे कितीही त्रास सहन करत असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागात ’सारे काही आलबेल’ असल्याचे चित्र असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निद्रिस्त अवस्थेबद्दल वाहनचालक आणि नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

खड्ड्यांमुळे अपघातांना आमंत्रण

कळवण-देवळा रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघाताच्या गंभीर घटना घडल्या आहेत.खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात घडत असल्याने या रस्त्यावरील खड्डे अपघातांना आमंत्रण देणारे ठरत असून सार्वजनिक बांधकाम विभागाची कुचराई याला कारणीभूत
ठरत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -