शेतमालाला भाव मिळत नसल्याने पाच एकर कोबीवर फिरवला नांगर

नाशिक : शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील शेतकरी अंबादास खैरे यांनी आपल्या शेतात पिकविलेल्या कोबी पिकाला केवळ १ रुपया भाव मिळत असल्याने त्यांनी पाच एकर क्षेत्रातील कोबी पिकावर ट्रॅकरच्या सहय्याने नांगर फिरविला.

राज्यातील कांदा, द्राक्ष यासह विविध शेतमाल पिकविणारा शेतकरी आपल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे. कांदा दराबाबत विधीमंडळात रणकंदन सुरू आहे. अशातच आता भाजीपाला पिकांनाही भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गाचा सरकारविरोधात असंतोष दिसून येत आहे. नाशिक जिल्हयातील पाडळी देशमुख येथील शेतकरी अंबादास खैरे यांनी कोबी लागवडीसाठी प्रती एकर ५० हजार रुपये खर्च केला आहे. एकूण पाच एकर कोबी लागवडीसाठी त्यांचा अडीच लाख रुपये खर्च झाला आहे. मात्र कोबी पिकाला केवळ १ रुपये भाव मिळत असल्याने त्यांनी शासनाचा निषेध नोंदवत आपल्या पाच एकर कोबी पिकावर नांगर फिरविला. तसेच शासनाने शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले नाही तर शेतकरी पुन्हा एकदा संपावर जातील असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे. परंतू कुठल्याही परिस्थित खचून न जाता आत्महत्या करू नये. शासनाला आपली दखल घ्यावीच लागणार आहे. जर शेतकर्‍यांना शासनाने योग्य ती मदत केली नाही तर सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ. : अंबादास खैरे, शेतकरी