Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र एकलहरेतील राख जमिनीत पसरवून "विषप्रयोग"

एकलहरेतील राख जमिनीत पसरवून “विषप्रयोग”

Subscribe

प्रदूषण : शेतातील हजारो टन राखसाठ्यातून भूजलात विषारी घटक मिसळण्याची भीती; अनियंत्रित खोदकामे दुर्लक्षित

नाशिक : एकलहरे विद्युत निर्मिती केंद्रातून तयार होणारी राख बंधार्‍यातून रोज शेकडो ट्रकच्या माध्यमातून उचलली जात असून, कोटमगाव, हिंगणवेढा, सामनगाव परिसरातील व्यावसायिक व शेतकरी आपल्या शेतात व घराच्या अंगणात राखेचे मोठे साठे करत असल्याने याठिकाणी जमिनीतील पाणी व शेतातील पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात विषारी घटकांच्या प्रदुषणाचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्थानिक राख व्यावसायिक बाहेरील ट्रकचालक-मालकांना दमदाटी करत अधिक रकमेची मागणी करत असल्याची तक्रार वीट उत्पादक व ट्रकचालक-मालक संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक व बाहेरील व्यावसायिकांत वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक येथील एकलहरे विद्युत निर्मिती केंद्रातून निर्माण होणार्‍या राखेमुळे हवा, पाणी प्रदुषित होत असल्याच्या कारणास्तव एकलहरे, हिंगणवेढे, कोटमगाव, सामनगाव व ओढा परिसरातील शेतकर्‍यांनी कित्येक वर्षांपासून आंदोलने केली होती, प्रकल्पाच्या बंधार्‍यातील राख उडून शेतातील पिकांवर राखेचे थर जमत असल्याने पिके धोक्यात आल्याची तक्रार हिंगणवेढा गावातील शेतकर्‍यांनी थेट जिल्हाप्रशासनाकडे तक्रार केल्याने दखल घेत उपाययोजना करण्यासाठी एकलहरे प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. हवेत उडणार्‍या राखेने जितके प्रदूषण होते, त्यापेक्षा अधिक प्रदूषण जमिनीतून होत असल्याचे निष्कर्ष प्रदूषण महामंडळ व आरोग्य विभागाच्या राज्यभरातील औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या संदर्भाने तयार करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे. असे असताना कोटमगाव, हिंगणवेढा व सामनगाव भागातील असंख्य ठिकाणी राखेचा साठा केला जात आहे. साठवणूक केलेली राख सुरक्षित राहावी, यासाठी काही ठिकाणी जमिनीत दहा ते पंधरा फूट तर काही ठिकामी २० ते २५ फूट खोल खोदण्यात येऊन याठिकाणी राखेचा साठा केला जात आहे.
बंधार्‍यात राख भरण्यासाठी स्थानिकांची दादागिरी सुरु असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत, बांधकाम विटामंध्ये राखेचा वापर करणे बंधनकारक असताना स्थानिक वीट व्यावसायिकांना धमकावले जात असून राखेच्या मोबदल्यात अव्वाच्या सव्वा रक्कम घेत असल्याची तक्रार आहे. एका बाजूला राखेचा साठा केला जातो, तर वीट व्यावसायिकांना अधिक दराने खरेदीसाठी प्रवृत्त केले जाते. अशा अवस्थेत तक्रारी होत असून यातून वाद होण्याची दाट शक्यता बोलली जाते. मात्र, याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता दिवसभर प्रशासकीय बैठका सुरू असल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

महसूल विभागाची चुप्पी ?

- Advertisement -

एरव्ही एखादा ट्रॅक्टर रस्त्यावरून मुरुम किंवा वाळू वाहतूक करत असेल तर त्यावर रॉयल्टी किंवा खोदकामाचा परवाना मागणी करत कारवाईचा बडगा उचलला जातो. मात्र, या भागात सर्रास मोठे खड्डे खोदून यातील मुरुम व माती गौण खनिजाची वाहतूक करुन विक्री केली जात आहे. याकडे महसूल विभागावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राखेचे वीट उत्पादक व ट्रकचालक-मालक संघटनेचे निवेदन

शिंदे-पळसे-वडगाव-चिंचोली आदी परिसरातील वीटभट्टीधारक व ट्रकचालक-मालक संघटनेच्या वतीने राखेचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत याविषयी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. जिल्हा प्रशासन, महसूल विभाग व नाशिकरोड पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनावर व्यावसायिक केशव एखंडे, मनसेचे तालुकाध्यक्ष सुनील गायधनी, किरण नरवडे, रतन सरोदे, दिगंबर ढमाले, माधव एखंडे, रामदास नवले, भाऊसाहे घोटेकर, संदीप ढोकणे, संतोष घोटेकर, श्रीकांत कांगणे, संतोष ढमाले, सोमनाथ गोरे, बाळासाहेब हांडोरे आदींच्या सह्या आहेत.

भूजल प्रदूषणाने पिकांसह जिवितास धोका !

- Advertisement -

पावसाळा असल्याने शेकडो ठिकाणी जमिनीत खोल पुरलेल्या राखेत पाणी जाऊन त्यापासून विषारी घटक भूजलात मिश्रीत होऊन मोठे प्रदूषण निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. याचे भान या व्यावसायिकांनी ठेवणे गरजेचे आहे. राखेची किंमत लाखात असली तरी याच भागात राहणारी कुटुंब, नातेवाईक व ग्रामस्थांच्या जिवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

राखेतील विषारी घटक; स्थानिक गप्पच

फ्लाय अ‍ॅशच्या नमुन्यांमध्ये पीएम-२.५ व पीएम-१० च्या कणांसह आर्सेनिक, कॅडमियम, लेड, मॅगनीज, मर्क्युरी, कोबाल्ट आदी जड धातूचे घटक आढळतात. हेच विषारी घटक आसपासच्या परिसरात भूपृष्ठावरील पाणी व भूजलात आढळून आल्याने या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित करत १५ वर्षांपूर्वी महानिर्मिती कंपनीच्या विरोधात आंदोलने केली गेली होती. मर्क्युरी, आर्सेनिक, लिथियम, अल्युमिनियम, सेलेनियम, आयर्न, कॉपर, झिंक, फ्लोराईड, अ‍ॅन्टीमॉनी, बोरोन, मॉलिबडेनम, आदी विषारी घटक आढळल्याचे त्यावेळी केलेल्या तक्रारीत म्हटले होते. आता बंधार्‍यातील राख थेट शेतात आणून टाकत असल्याने स्थानिकांचा विरोध का नाही, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

प्रदुषणाच्या तक्रारी, प्रशासनाची दखल

वीज केंद्रात निर्माण होणार्‍या राखेपासून परिसरातील गावतील शेतीपिके बाधित होत असल्याच्या तक्रारी काही शेतकर्‍यांनी एकलहरे व जिल्हा प्रशासनाकडे केल्या होत्या. त्याची दखल घेत पाहणी केल्यानुसार राखेपासून पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर जिल्हा प्रशासनाने वीज कंपनीला उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

सफेद राखेचा काळाबाजार, साठेबाजी

औष्णिक राखेचा वापर बांधकामासाठी लागणार विट (ब्लॉक) निर्मिती, विट भट्टी व्यवसाय, रस्ते, बांधकाम आदी कामांसाठी सर्रास वापर केला जातो, सध्या एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून वीजनिर्मिती निम्म्यावर आली असल्याने निर्माण होणार्‍या राखेचे प्रमाण कमी झाले आहे. यातून कमी खर्चात मिळणार्‍या राखेची साठेबाजी सुरु केल्याने काळा बाजार होत असल्याचे म्हटले जाते.

विषारी राख आणि गंभीर आजार

एकलहरे औष्णिक राखेमुळे परिसरातील गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित करत ज्या गावातील ग्रामस्थांनी मोठे आंदोलन उभारले होते. त्यावर प्रदूषण महामंडळ व प्रशासनाने ताशेरे ओढले होते. पावसाळ्यात राखेतील पाणी जमिनीत जाऊन शेती पिके व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रदुषित पाण्यामुळे कर्करोग, दमा, हृदयरोग, किडनीचे आजार उद्भवण्याची शक्यता असल्याचे या भागातील गावातील आंदोलकांचे म्हणणे होते.

राखेची कृत्रिम टंचाई आणि गुन्हेगारी

राख उचलण्यासाठी महानिर्मिती कंपनीचे नियम असले तरी राखेच्या बंधार्‍यातून जेसीबी व पोक्लॅनच्या मदतीने ट्रकमध्ये भरण्यासाठी हजार पाचशे रुपये घेतले जातात. मात्र, याठिकाणी बाहेरील वाहने भरण्यासाठी पाच ते दहा हजार रुपयांची मागणी होत असल्याची तक्रार आहे.

- Advertisment -