घरक्राइमवृक्षांवर विषप्रयोग; शहरातील गंगापुररोड भागातील प्रकार

वृक्षांवर विषप्रयोग; शहरातील गंगापुररोड भागातील प्रकार

Subscribe

अडथळे ठरणार्‍या झाडांना मारणार्‍या टोळ्या कार्यरत

नाशिक : शहरातील हिरव्यागार झाडांच्या बुंध्यालगत अ‍ॅसिड टाकून या झाडांना संपवणार्‍या टोळ्या कार्यरत असल्याची धक्कादायक बाब गंगापूर रोडवरील एका घटनेवरुन उघडकीस आली आहे. या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी बूचाच्या चार झाडांच्या बुडाखाली अ‍ॅसिड टाकले आहे. याप्रकाराची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी घटनास्थळी भेट देत चौकशीचे आदेश दिले आहेत.

शहरात गेल्या काही दिवसांपासून विदेशी प्रजाती असलेल्या गुलमोहराची झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. ही झाडे पर्यावरणदृष्ठ्या कोणत्याही बाबतीत पूरक नसल्याने ती तोडून त्यांच्या ठिकाणी भारतीय प्रजातीची झाडे तोडण्याची मागणी वृक्षप्रेमींसह पर्यावरणप्रेमींकडून केली जाते आहे. देशी प्रजातींच्या झाडांची संख्या वाढवण्याची मागणी होत असताना, दुसरीकडे मात्र गंगापूररोडवरील केबीटी सर्कल परिसरात असलेल्या बॉस्को सेंटरलगत रस्त्याकडेला असलेल्या देशी झाडांची मात्र नियोजनबद्ध कत्तल करण्याचा डाव उघडकीस आला. ही बूचाची झाडे पूर्ण वाढलेली असून, त्यांच्या बुंध्यालगत अ‍ॅसिडसदृश्य रसायन टाकून या झाडांना संपविण्याचा प्रयत्न झाला आहे.

- Advertisement -

बूच प्रजातींची देशी आणि अतिशय उपयुक्त असलेल्या या चार झाडांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे कृत्य नेमके कोणी केले हे जरी उघड झालेले नसले तरी प्राथमिक संशयाच्या आधारे या झाडांच्या मागे असलेले खासगी जाहिरात फलकाच्या मालकाला पालिका प्रशासन नोटीस पाठवणार असल्याचे उपायुक्त मुंडे यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज व स्थानिकांच्या मदतीने दोषींपर्यंत पोहोचून कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे.

अशी आहे दंड आणि शिक्षेची तरतूद

कुठल्याही देशी प्रजातींचे झाड विनापरवानगी तोडले तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दोषी व्यक्तीला किमान ७४ हजार गुणिले त्या झाडाचे वय इतका दंड होतो. तसेच, फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल होऊन तीन ते सहा महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते.

- Advertisement -

पावसामुळे वाचले झाडांचे प्राण

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेले अ‍ॅसिडसदृश्य केमिकल १० ते १२ दिवसांपूर्वी बुंध्याशी टाकण्यात आल्याचे तेथील एका फळविक्रेत्याने सांगितले. सुदैवाने, याच दिवशी जोरदार पाऊस आल्याने ते केमिकल वाहून गेले. महापालिका अधिकार्‍यांनी घटनास्थळी केलेल्या पाहणीत झाडाचा बुंधा काही प्रमाणात जळाला असला तरी पावसामुळे झाड वाचले आहे, असे आढळून आले. परंतु, अशापद्धतीने आपल्या स्वार्थासाठी झाडांचा जीव घेणे अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकारामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

 

वृक्षतोडीप्रकरणात दोषींवर गुन्हा दाखल करून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे दंडात्मक कारवाई करते. याप्रकरणी प्रथमदर्शनी संशयाच्या आधारे झाडांमागील खासगी जाहिरात फलक मालकाला नोटीस पाठवली जाईल. त्यात दोषींवर कारवाई केली जाईल. : विजयकुमार मुंडे, उपायुक्त, महापालिका

पावसामुळे अ‍ॅसिडची तीव्रता कमी होऊन ही झाडे वाचली. हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर आहे. पालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हे कृत्य करणार्‍याला शोधून त्याच्याविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करावी. : अंबरीश मोरे, पर्यावरणप्रेमी

एकीकडे गेल्या काही वर्षात शासन आणि वृक्षप्रेमी यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड उपक्रम सुरू आहेत. दुसरीकडे वृक्षहत्येचे प्रकार होत असतील तर पर्यावरण कृती समिती याचा तीव्र विरोध करेल. देशी झाडे वाढविण्यासाठी प्रयत्न होत असताना असे कृत्य करणार्‍यावर कठोर कारवाई करावी. : चंद्रशेखर पाटील, पर्यावरणप्रेमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -