इघे खूनप्रकरण : संशयित मुख्य आरोपी विनायक बर्वेला अटक

सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची कारवाई

murder

सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांच्या हत्येप्रकरणी शहर पोलिसांनी राष्ट्रवादी संलग्न महाराष्ट्र वंचित कामगार संघटनेचा पदाधिकारी मुख्य संशयित आरोपी विनायक उर्फ विनोद बर्वे याला अवघ्या काही तासांत अटक केली. हत्या केल्यानंतर बर्वे मुंबईच्या दिशेने फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर वेगाने चक्र फिरवत पोलिसांनी बर्वेला घटनेनंतर काही तासांत अटक केली.

सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची शुक्रवारी (दि.२६) हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सकाळी ७.३० वाजेदरम्यान सातपूर औद्योगिक वसाहतीमधील कार्बननाका येथे धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला. या घटनेनंतर भाजपने थेट सातपूर पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल इघे हे शुक्रवारी सकाळी कामगार युनियनच्या कामासाठी सातपूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपनीत गेले होते. गेल्या काही दिवसांपासून या कंपनीत युनियन स्थापनेवरून दोन युनियनमध्ये वाद सुरू आहेत. इघे यांनी युनियन स्थापन करण्यास दुसर्‍या युनियनच्या प्रमुखासह काही कामगारांचा विरोध होता. यावर तोडगा काढण्यासाठी इघे शुक्रवारी सकाळी कंपनीत गेले होते. यावेळी बर्वे व इघे यांची भेट झाली. यावेळी बर्वे याने धारदार शस्त्राने इघे यांच्या मानेवर वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर बर्वे फरार झाला.

ही घटना समजताच सातपूर पोलिसांनी इघे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. गुन्हा दाखल केल्यानंतर नाशिक शहर पोलिसांनी हल्लेखोर बर्वे याचा शोध सुरू केला. त्याला पोलिसांनी दुपारी ठाणे जिल्ह्यातून अटक केली. पोलीस चौकशीत त्याने युनियन वादातून खून केल्याची कबुली दिली आहे.