पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

police officer suicide
प्रातिनिधिक छायाचित्र

मालेगाव येथील पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांचे वाचक पोलीस उपनिरीक्षक अझहर शेख (38) यांनी कर्तव्यावर असताना शनिवारी (दि.11) दुपारी 4.30 वाजेदरम्यान सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या कौटुंबिक कारणातून केली असल्याची चर्चा पोलिसांमध्ये आहे.

अझहर शेख यांनी महिला समुपदेशन कार्यालयाच्या परिसरात झाडाखाली स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरामधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही बाब वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना समजली असता त्यांच्यासह इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी मालेगावात मोठ्या संख्येने हजर असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. शेख यांची पोलीस दलात कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख होती. ते काही दिवसांपासून कौटुंबिक अडचणींमुळे ताणतणावात असायचे असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.