ब्युटी पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणार्या कुंटणखाण्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकत तो चालवणार्या महिलेसह दोन तरुण व नऊ तरुणींना ताब्यात घेतले. गुरूवारी, ३१ जानेवारीस सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.
गंगापूररोडवरील लक्ष्मी विलास बिल्डींग या उच्चभ्रु वसाहतीत काही मुलींकडून देहविक्रय व्यवसाय केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांच्या पथकाने ब्युटी पार्लरमध्ये गुरुवारी छापा टाकला. या कुंटणखाण्यात बंगाली व महाराष्ट्रीयन अशा नऊ तरुणींकडून वेश्या व्यवसाय केला जात असल्याचे उघड झाले. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार गंगापूर पोलिसांनी या ठिकाणी दोन वेळा छापा टाकला होता. मात्र, दोन्हीही वेळा त्यांचा सापळा अयशस्वी ठरला. सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने टाकलेला छापा मात्र, यशस्वी झाल्याने गंगापूर पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबतच आता चर्चा रंगू लागल्या आहेत. यापूर्वीही नवशा गणपती परिसरातील एका अवैध धंद्याच्या प्रकरणातही गंगापूर पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली होती.
गंगापूर पोलिसांच्या संगनमताबाबत आता सांगता येणार नाही
कुंटनखानाचालक आणि गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस यांच्या संगनमताने कुंटखाणा चालवला जात होता का, हे आता सांगता येणार नाही. या घटनेचे गांभीर्य ओळखून लैंगिक शोषण होऊ नये, यासाठी सरकारवाडा पोलिसांना आदेश दिले.
– आर. आर. पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त