नवरदेवासह वाजंत्री पोलिसांच्या दारी..!

हळदीच्या कार्यक्रमात ढोल-ताशांचा दणदणाट

 नाशिक; हळदीच्या कार्यक्रमात मोठमोठ्याने ढोल-ताशांचा दणदणाट, सार्वजनिक ठिकाणी गर्दी यामुळे वाजंत्री, नवरदेवासह वरपित्याला पोलीस ठाण्याची वारी करावी लागली. पोलिसांनी ढोल-ताशा जप्त केला असून, लग्नापूर्वीच नवरदेवासह वाजंत्र्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तालयासमोरील मल्हारखान झोपडपट्टीत ढोल व ताशांचा मोठा आवाज आल्याने सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्रसाद संतोष बुकाने यांच्या हळदीचा कार्यक्रम विनापरवानगी चालू होता. या कार्यक्रमानिमित्त नागरिकांची गर्दी झाली होती. त्यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी नवरदेव प्रसाद बुकाने व वाद्य वाजवणार्‍या ६ तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.