घरताज्या घडामोडीनगरपंचायतीची निवडणूक : देवळा शहरातील राजकारण तापलं

नगरपंचायतीची निवडणूक : देवळा शहरातील राजकारण तापलं

Subscribe

निवडणुकीची रणधुमाळी सुरू : उमेदवारीसाठी इच्छुकांची नेत्यांकडे गर्दी

जगदीश निकम,  देवळा

भाजपचे प्राबल्य असलेल्या देवळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत यंदा महाविकास आघाडीच्या रुपाने वेगवेगळ्या पक्षातील मातब्बर नेते या निवडणुकीत आपले राजकीय भवितव्य आजमावणार आहेत. नगरपंचायतीची निवडणूक जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरु केल्यामुळे वाढत्या थंडीसोबत देवळा शहराचे राजकीय वातावरण मात्र गरम होत चालले आहे.

- Advertisement -

देवळा शहर व तालुक्यात भाजप आघाडीवर आहे. विविध संस्थावर भाजपचा एकछत्री अंमल आहे. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडीचा फॉर्म्युला मोठे आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहे. गेल्या पंचवार्षिक नगरपंचायत निवडणुकीत देवळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेली शहर विकास आघाडी यावेळी होणार नाही. मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षानेच फक्त चिन्हावर निवडणूक लढवली होती. शहर विकास आघाडीचे व इतर उमेदवार अपक्ष म्हणून लढले होते. अपक्षांची निवडणूक म्हणून तिचा उल्लेख होतो. आमदार डॉ.राहुल आहेर व भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नेतृत्वाखाली देवळा नगरपंचायत क्षेत्रात विविध विकासकामे केल्याचा भाजपचा दावा आहे. मागील वर्षी जितेंद्र आहेर यांच्यासारखा चांगला विरोधक आपल्या गटात घेऊन विरोधकाची ताकद कमी करण्यात भाजपला यश आले असले तरी बहुतांश प्रभागातील निवडणुका चुरशीच्या होणार आहेत.

आतापर्यंत मौन पाळून असलेल्या विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कॉग्रेस व त्यांच्या मित्र पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी तयार करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यादृष्टीने बैठकाही घेतल्या जात आहेत. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नगरपंचायत निवडणूकीसाठी प्रत्येक प्रभागातून इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. एकाच पक्षातून अथवा पॅनलकडून अनेकांनी तयारी सुरू केल्याने सर्वच पक्षांना उमेदवारी देतांना दमछाक होणार आहे. इच्छुकांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांच्या घरी तसेच कार्यालयात वार्‍या सुरू केल्याने इच्छुकांची मनधरणी करतांना नेतृत्वासमोरच पेच निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

प्रभागरचना अशी..

देवळा नगरपंचायतीचे १७ प्रभाग असून यातील ९ प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी आहेत. यात प्रभाग क्र. १, ५, ६, ११, १२, १४, १५, १६ आणि १७ या प्रभागांचा समावेश आहे. येथे उमेदवारीसाठी सर्वाधिक चुरस रंगणार आहे. याशिवाय नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) प्रभाग क्र.४, ८, १०, १३ हे चार प्रभाग राखीव आहेत. येथेही जोरदार रस्सीखेच आहे. तसेच अनुसूचित जमाती (एसटी) आणि अनुसूचित जाती (एससी) साठी ४ प्रभाग आरक्षीत आहे. यामध्ये ‘एसटी’साठी प्रभाग २, ३ व अनुसूचित जाती (एससी) साठी प्रभाग ७ आणि ९ हे आरक्षित आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -