राजकीय वारसा, घरात सदैव जनतेचा राबता: तरी, अश्विनीने घातली उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी

देवळा : कुटुंबाची साथ, आत्मविश्वास अन् प्रामाणिक कष्टाची साधना करत देवळा येथील तेजस्विनी प्रफुल्ल आहेर हिने उपजिल्हाधिकारीपदाला गवसणी घातली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या राज्यसेवा २०२१ च्या स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात ती इतर मागासवर्ग संवर्गात राज्यात मुलींमध्ये दुसरी तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तिची १०३ रँक आहे.

तेजस्विनीचे मूळ गाव देवळा असून माजी सरपंच (कै.) पीकेअप्पा आहेर यांची ती नात आहे. कुटुंबात राजकारणाचा वारसा असला तरी आपण प्रशासन सेवेत करियर करायचे या ध्येयाने तिने रात्रीचा दिवस करत तेजस्विनी हे नाव सार्थ केले. तिचे प्राथमिक शिक्षण शारदा देवी ज्ञान विकास मंदिर व माध्यमिक शिक्षण जिजामाता कन्या विद्यालयात झाले. बारावीनंतर तिने सिंहगड कॉलेज (पुणे) येथे इंजिनीअरिंगची मेकॅनिकल पदवी मिळवत २०१७ पासून लगेचच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. क्लास व अभ्यासिकेत सलग दहा-अकरा तासांचा अभ्यास, वर्तमानपत्रातील टिपणे, संदर्भ पुस्तकांचे वाचन यातून हा यशाचा मार्ग केल्याचे तेजस्विनीने सांगितले.

तिची आई जयश्री व वडील प्रफुल्ल आहेर हे शेती करतात तर काका सुनील आहेर हे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष असून, काकू माजी जि.प. सदस्या डॉ. नूतन आहेर हे राजकारण व समाजकारणात सक्रिय आहेत. वाजगाव येथील दुसरी भूमिपुत्र व आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गा देवरे हिची देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी पदावर खेळाडूंसाठी असलेल्या राखीव जागेतून निवड झाली आहे. या दोघींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

धीर खचू न देता प्रयत्न व आत्मविश्वास कायम जिवंत ठेवल्याने हे यश मिळवू शकले. ग्रामीण भागातील मुलामुलींनी मोबाईलचा फक्त अभ्यासासाठी वापर करावा. : तेजस्विनी आहेर

मनी नात डेप्युटी कलेक्टर व्हयनी हाऊ आनंद मोठा शे. आमले तिना अभिमान वाटस. : वत्सलाबाई आहेर (आजी), माजी नगरसेविका