पीओपीच्या गणेशमूर्ती वरील बंदीमुळे मूर्तिकारांवर विघ्न

बृहन्मुंबई महापालिकेप्रमाणेच नाशिक महापालिकेनेही पीओपी मूर्ती वापरास परवानगी देण्याची विक्रेत्यांची मागणी

नाशिक : अवघ्या दीड महिन्यावर अर्थात ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेशोत्सव आलेला असताना अजूनही पीओपी मूर्तींवरील बंदी कायम ठेवायची की काही अटी घालून यंदा मूर्ती वापरावर परवानगी मिळणार याबाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महापालिकेप्रमाणे नाशिक महापालिकेनेही पीओपी मूर्तींच्या वापरास परवानगी देण्याची मागणी स्थानिक मूर्ती विक्रेत्यांकडून केली जात आहे.

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती निर्मिती, साठवणूक व विक्रीवर नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. पीओपीच्या मूर्तींमुळे जलप्रदूषण होत असल्याच्या कारणास्तव केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१० मध्ये पीओपीचा वापर करू नये याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. त्यानंतर २०२० मध्ये सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली. तसेच, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती बनवण्यावर आणि त्या वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मूर्ती निर्मिती कारखाने, कारागीर, मूर्ती विक्रेते, साठवणूक करणारे व्यापारी, दुकानदार आणि गाळेधारकांना महापालिका आयुक्त यांनी २० मे रोजी जाहीर निवेदनाद्वारे पीओपी बंदीबाबत कळवले असून, जर कोणी या नियमांचे उल्लंघन केले तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

बंदीची नोटीस मिळताच अनेक मूर्तीकार तसेच, विक्रेत्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेत चर्चा केली. परंतु, कोणताही मार्ग निघालेला नाही. त्यामुळे मूर्तीकार व विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे. अनेक मूर्तीकारांकडे लाखो रुपयांचा कच्चा माल पडलेला आहे. तर, काही विक्रेत्यांनी दिवाळी नंतरआपल्या मूर्तींची आगाऊ पैसे देऊन बुकिंग केलेली असल्याने मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत. मूर्तीकारांनी आलेल्या बुकिंगच्या पैशातून कच्चा माल घेऊन मूर्ती तयार करून ठेवल्या असून आता अचानक आलेल्या या बंदी आदेशामुळे मूर्तीकार व विक्रेत्यांसमोर संकटांचा डोंगर उभा आहे. राज्यातील सर्वात मोठ्या बृहन्मुंबई महापालिकेने २८ जून रोजी काढलेल्या पत्रकात महापालिका कार्यक्षेत्रातील पीओपी मूर्तीच्या बंदीबाबत सौम्य भूमिका घेत मुंबईत यावर्षी पीओपीच्या मूर्ती वापरावर काही अटी घालून परवानगी दिली आहे. त्यात विशेषतः घरगुती व सार्वजनिक गणपती मूर्तींचे आकडे लक्षात घेत हा निर्णय घेतला आहे. शाडूच्या मूर्ती सुकण्यासाठी व मूर्ती बनविण्यासाठी अधिक कालावधी लागतो. एवढ्या कमी वेळात मोठ्या संख्येत शाडूच्या मूर्ती तयार करणे शक्य नाही. तसेच, शाडूच्या मूर्ती खर्चिक असल्याने त्याचा गणेशोत्सवावर परिणाम होईल. बृहन्मुंबई महापालिका पीओपी मूर्तींवरील बंदीत काही अटी-शर्तींवर शिथिलता देऊन वापरासाठी परवानगी देत असेल तर राज्यातील इतर महापालिका आणि नगरपालिका त्याच अटींवर विचार करून आपल्या कार्यक्षेत्रात पीओपी मूर्तींचा वापरास परवानगी देण्याची मागणी होते आहे.