घरमहाराष्ट्रनाशिकपत्र टाकण्यासाठी जातो अन् पुस्तकं घेऊन परततो

पत्र टाकण्यासाठी जातो अन् पुस्तकं घेऊन परततो

Subscribe

सुरगाणा तालुक्यातील पोस्टमनने सुरू केले अनोखे वाचनालय

‘त्याची’ रोजच गावकरी वाट बघतात.. तो सायकलवर येतो.. घरामध्ये पत्र टाकतो आणि तेथून जुने पुस्तक घेऊनच परत निघतो… अडगळीत असलेली पुस्तक तो संकलित करतो. ‘थेंबे-थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे पोस्टमनने सुरगाणा तालुक्यातील आळिवदांड या छोट्याशा पाड्यात चक्क वाचनालय सुरू केले आहे. पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसह अबालवृद्ध या वाचनानंद घेण्यासाठी नित्यनेमाने येतात. राज्य शासनानेही विशेष बाब म्हणून या छोटेखानी वाचनालयाला परवानगी दिली आहे. गेल्या वर्षभरात या वाचनालयात तब्बल तीनशेपेक्षा अधिक पुस्तके संकलित झाली आहेत.

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील पश्चिम भागातील आळिवदांड या पाड्यावरील हेमराज प्रकाश महाले हा आदिवासी युवक बार्‍हे परिसरातील चार- पाच गावांमध्ये पोस्टमनची नोकरी करतो. हेमराज हा २४ वर्षीय युवक घरोघरी पत्र वाटपाचे काम करताना परिसरातील लहान मुलांना वाचण्याचे अजिबात वेड नाही, ही खंत मनात ठेऊन काहीतरी जगावेगळे करण्याचा विचार करत होता. यातूनच पत्र वाटपासाठी आपण घरोघर जात आहोत, तर वेळ वाचेल या उद्देशातून त्याने पत्र वाटप करतानाच ‘आपल्या घरात अडगळीत पडलेली काही पुस्तके असतील तर मला ती द्या, ती पुस्तके मी मुलांना वाचण्यासाठी देत जाईन’ असे सांगत अवांतर पुस्तके गोळा करण्याचा उपक्रम सुरू केला. यातून त्यास युवराज धूम, वसंत राठोड, पांडुरंग धूम, रमेश थोरात, दीपक चव्हाण यांनी पुस्तकांच्या रुपात चांगली मदत केली. यातूनच पुढे वाचनालयाची स्थापना करण्याचा विचार मनात आला. योगायोगाने राज्य शासनाने विशेष बाब म्हणून १९५ एवढीच पुस्तके असताना वाचनालयास परवानगी दिली. विशेष म्हणजे या वाचनालयास नाशिकमधील अनेक दानशुरांनी घरातील पुस्तके देऊन हातभार लावल्याने आजमितीस तब्बल तीन हजार पुस्तके संकलित झाली आहेत. परिसरातील आदिवासी मुले दररोेज गोष्टींची पुस्तके वाचण्यासाठी वाचनालयाची पायरी चढतात.

- Advertisement -

देशमुख सरांनी दिला ‘कानमंत्र’

समाजाकडून वाचनीय असलेली पुस्तके गोळा केली आहे. पण त्या पुस्तकांना इतर समाजापर्यंत व विशेषत: लहान मुलांपर्यंत नेण्यासाठी वाचनालय स्थापन करण्याची योजना त्याच्या मनात आली. समाजापर्यंत जाण्यासाठी योग्य प्रकारचे अधिष्ठान हवे तर वाचनालय स्थापन करणे गरजेचेच आहे असा ‘कानमंत्र’ त्यास प्राथमिक शिक्षक देविदास देशमुख यांनी दिल्याने कागदपत्र गोळा करत सरकार दरबारी पाठपुरावा सुरू केला. यातूनच ‘मीराताई सार्वजनिक वाचनालय आळिवदांड’ची पहिली वीट रचली गेली.

यांनी केली मदत

या वाचनालयाबाबत नाशिकमधील काही व्यक्तींना सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती झाली. त्यातूनच नाशिकच्या पंचवटी भागातील स्वामीनारायण इंग्लिश मीडियम स्कूलमधील क्रीडा शिक्षिका अर्चना नाटकर, माध्यम प्रतिनिधी सुधीर पेठकर, सुनील पाटील, सावळीराम तिदमे, पोपटराव जगझाप, गणेश सांगळे, छायाचित्रकार हिरामण सोनवणे यांनीही मीराताई सार्वजनिक वाचनालयासाठी पुस्तके दान केली आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक पुस्तके सामान्य ज्ञान, लहान मुलांना आवडणारी व माहितीपर स्वरुपाची आहेत. नाशिकमध्ये कुणाला जुनी पुस्तके दान द्यायची असल्यास त्यांनी ९८२२५०९२१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

अभ्यासिकेचे स्वरूप देण्याचा प्रयत्न

आळिवदांड या छोट्याशा पाड्यावर जिल्हा परिषदेच्या शाळेची एक खोली रिकामी होती. सध्या त्याच खोलीत ही पुस्तके ठेवण्यात आली असून रोज सायंकाळी लहान लहान मुले गोष्टींची पुस्तके वाचण्यासाठी येण्यास सुरूवात झाली आहे. यातून वाचनालयासह अभ्यासिका सुरू करण्याचा मानस असल्याचे हेमराज महाले याने सांगितले. सध्या चार ते पाच वर्तमानपत्र वाचनालयात ठेवली जात असून परिसरातील युवक वाचनासाठी या पाड्यावर येत आहेत. विशेष म्हणजे सुरगाण्यासारख्या तालुक्यात सार्वजनिक वाचनालय नसल्याने ती तूट या वाचनालयामुळे भरून निघालेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -